अकाेला: नळाला लावण्यात आलेल्या मीटरचे रिडिंग न घेताच अकाेलेकरांना अव्वाच्या सव्वा दराने पाणीपट्टीच्या देयकांचे वाटप करण्यात आले. मनपा प्रशासनाने नियुक्त केलेल्या जी. एस. महालदार नामक एजन्सीने रिडींग न घेताच देयकांचे वाटप केलेच कसे, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे शहरप्रमुख तथा गटनेता राजेश मिश्रा यांनी नागरिकांना पाणीपट्टी जमा न करण्याचे आवाहन मंगळवारी आयाेजित पत्रकार परिषदेत केले. प्रशासनाने ही प्रक्रिया रद्द न केल्यास महापालिकेला कुलूप ठाेकण्याचा इशारा राजेश मिश्रा यांनी यावेळी दिला.
महान येथील धरणातून उचल केल्या जाणाऱ्या पाण्याची निकषांनुसार माेजदाद करता यावी, या उद्देशातून मनपाने नळ जाेडणी वैध केल्यानंतर नळाला मीटर लावण्याची माेहीम सुरू केली हाेती. आजराेजी शहरात ६३ हजार पेक्षा अधिक नळ जाेडणी वैध असून त्यापैकी केवळ ३३ हजार ५५८ नळांना मीटर बसविण्यात आली. अवैध नळ जाेडणी यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. प्रशासनाने नियुक्त केलेल्या जी. एस. महालदार या एजन्सीने मनमानीरित्या पाणीपट्टी देयकांचे वाटप केल्याचे सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सांगितले. उदा. स्लम भागातील नळ धारकांना १०० युनिटसाठी एक हजार रुपयांचे देयक देणे अपेक्षित असताना एजन्सीने तीन हजार रुपये व काही नळ धारकांना ५ हजार, ८ हजार ते १० हजारापर्यंत दर आकारणी केल्याचे मिश्रा यांनी सांगितले. दरआकारणी करताना मीटरचे रिडिंग घेण्यात आले नसल्यामुळे एजन्सी व मनपाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे राजेश मिश्रा म्हणाले. पत्रकार परिषदेला नगरसेवक गजानन चव्हाण, शशिकांत चाेपडे, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, मा.नगरसवेक शरद तुरकर, युवासेना शहरप्रमुख नितीन मिश्रा, संजय अग्रवाल, याेगेश गीते, विभागप्रमुख रुपशे ढाेरे, उपविभाग प्रमुख आशू तिवारी आदी उपस्थित हाेते.
सत्ताधारी भाजपकडून अकाेलेकर वेठीस
जलप्रदाय विभागाने नियुक्त केलेल्या एजन्सीला कंत्राट देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभागृहात सत्ताधारी भाजपने घेतला हाेता. आता जादा दरानुसार देयकांचे वाटप केल्या जात असल्याचे उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी झाेन कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. हा प्रकार पाहता प्रशासन व सत्ताधारी भाजपकडून अकाेलेकरांना वेठीस धरल्या जात असल्याची टीका गटनेता राजेश मिश्रा यांनी केली.