- आशिष गावंडे लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष दूर करणे व सरळ सेवा पदभरती व पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशातून प्रशासनाने ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील बिंदुनामावलीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला असून, या दोन्ही प्रस्तावांना मान्यता कधी मिळते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.महापालिकेतील बिंदुनामावली व आकृतिबंध अद्ययावत नसल्यामुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाल्याची परिस्थिती आहे. मनपाच्या आस्थापनेवर एकूण कर्मचाऱ्यांची संख्या व उपलब्ध मनुष्यबळाची तफावत ध्यानात घेऊन, कार्यरत कर्मचारी नेमके आहेत तरी किती, याची इत्थंभूत माहिती सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध नसल्यामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती आहे. यावर उपाय म्हणून शासनाने महापालिकेला आकृतिबंध तयार करण्याचे निर्देश दिले होते, तसेच बिंदुनामावली अद्ययावत करण्याची सूचना केली होती. दरम्यान, २०१९ मध्ये मराठा आरक्षण लागू झाले. मराठा आरक्षण लागू झाल्यामुळे सुधारित बिंदुनामावलीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या होत्या. यामध्ये जानेवारी महिन्यात ‘अ’, ‘ब’ श्रेणीतील कर्मचाºयांच्या बिंदुनामावलीचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे सादर करण्यात आला होता.सदर प्रस्ताव नगर विकास विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केल्याची माहिती आहे. दुसरीकडे ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील कर्मचाºयांचा प्रस्ताव मनपाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मनपातील पदभरतीचा मार्ग मोकळा होईल.
महापालिकेचा बिंदुनामावलीचा प्रस्ताव शासनाकडे; मनपा प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 10:46 AM