आशिष गावंडे, अकाेला: भूमिगत गटार याेजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी महापालिकेने १ हजार ६७४ काेटींचा सुधारित प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावावर शुक्रवारी मुंबईत राज्य शासनाच्या तांत्रिक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिकेने भूमिगतच्या याेजनेचे सादरीकरण केले. दरम्यान, याबाबतचा निर्णय तांत्रिक समितीने राखून ठेवल्यामुळे समितीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘अमृत अभियान’च्या पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार याेजनेंतर्गत शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शिलाेडा येथे ३० एमएलडी प्लान्ट उभारण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून मनपाला प्राप्त झालेल्या ८७ काेटींच्या निधीतून प्रशासनाने माेर्णा नदीपात्रातून शिलाेडा पर्यंत मलजलवाहिनीचे जाळे अंथरले. या वाहिनीद्वारे शिलाेडा येथे उभारण्यात आलेल्या ३० एमएलडीच्या सीवरेज ट्रीटमेन्ट प्लान्टमध्ये पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. तसेच सात एमएलडीचा प्लान्ट डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आला.
या दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील याेजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रशासनाने नागपूर येथील एजन्सीची नियुक्ती केली. एजन्सीने प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर मनपाने सुधारित प्रस्ताव तयार करुन तांत्रिक मंजूरीसाठी मजीप्राकडे सादर केला हाेता. तब्बल २ हजार ४८ काेटी ६० लक्षच्या प्रस्तावाला मजिप्राने तांत्रिक मंजूरी प्रदान केली हाेती. यामध्ये मलजल वाहिनीचे जाळे अंथरणे, पंम्पिंग मशीनद्वारे सांडपाण्याचा उपसा करणे, ताेडफाेड झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासह विविध तरतूदींचा समावेश आहे. दरम्यान, तांत्रिक समितीच्या सूचनेनुसार प्रकल्पाची किंमत कमी केल्यावर मनपाने १ हजार ६७४ काेटींचा सुधारित प्रस्ताव सादर केला. मुंबइत पार पडलेल्या बैठकीत शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या शहर अभियंता निला वंजारी, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता अमाेल डाेइफाेडे, उपअभियंता शैलेश चाेपडे आदी उपस्थित हाेते.
‘एसटीपी’साठी १२४ काेटींचा खर्चदुसऱ्या टप्प्यातील याेजनेसाठी ७१ एमएलडीचा मलनिस्सारण प्रकल्प (सीवरेज ट्रीटमेन्ट प्लान्ट)उभारल्या जाणार आहे. याकरीता मनपाने शिलाेडा भागात सुमारे २२ एकर इ क्लास जमिनीची निवड केली आहे. ‘एसटीपी’साठी १२४ काेटींचा खर्च अपेक्षित आहे.
मलजल वाहिनीसाठी ८०० काेटींची तरतूद‘भूमिगत’च्या दुसऱ्या टप्प्यात हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण शहरातील लहान माेठ्या नाल्या एकमेकांना जाेडल्या जातील. अर्थात, नव्याने अंथरल्या जाणाऱ्या मलजल वाहिनीचे अंतर तब्बल ८ लाख ३३ हजार ५४० मिटर असल्याची माहिती आहे. या कामावर ८०० काेटी ५१ लक्ष ४७ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
प्रकल्पाच्या किंमतीत पुन्हा सुधारणाभूमिगत गटार याेजनेसाठी प्रति माणसी १०० लिटर सांडपाण्याची माेजदाद गृहित धरण्यात येते. तरच मलजल वाहिनीद्वारे सांडपाणी प्रवाहित हाेऊ शकते. शहरातील १ लाख ३७ हजार ७६६ मालमत्तांमधील सांडपाणी मलजल वाहिनीला जाेडण्यासाठी ६४५ काेटी ९४ लाख रुपयांतून नवीन कनेक्शन प्रस्तावित केले हाेते. तूर्तास प्रकल्पाची किंमत कमी करण्यासाठी काही मालमत्तांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती आहे.