लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमध्ये दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आठ सदस्य पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात विशेष सभेच्या आयोजनासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासनाला येत्या २९ फेब्रुवारीपूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.शहरातील विकास कामांची गाडी रुळावर येत असल्याचे पाहून अकोलेकरांनी फेब्रुवारी २०१७ मधील महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाच्या पारड्यात मतांचे भरभरून दान दिले. मनपातील एकूण ८० नगरसेवकांपैकी ४८ नगरसेवक भाजपचे असून, निकषानुसार मनपा स्थायी समितीमध्ये सभापती पद व १६ सदस्यांपैकी १० सदस्य भाजपचे आहेत. २०१७ मध्ये स्थायी समितीपदी नगरसेवक बाळ टाले यांना संधी दिल्यानंतर २०१८ मध्ये नगरसेवक विशाल इंगळे व २०१९ मध्ये विनोद मापारी यांना सभापदी पदाची जबाबदारी देण्यात आली. या महिन्यात २९ फेब्रुवारी रोजी ‘स्थायी’मधील १६ पैकी आठ सदस्यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने संबंधित सदस्यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.त्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड करावी लागेल. त्यानुषंगाने मनपा प्रशासनाकडून विशेष सभेच्या आयोजनासाठी हालचाली सुरू झाल्या असून, येत्या २४ किंवा २५ फेब्रुवारी रोजी विशेष सभा पार पडेल. त्यानंतर सभापती पदाची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यादरम्यान, स्थायी समितीमध्ये निवड होण्यासाठी भाजपसह इतर राजकीय पक्षांतील इच्छुक नगरसेवकांनी ‘लॉबिंग’ सुुरू केल्याची माहिती आहे.
आठ सदस्य होतील निवृत्त!विद्यमान स्थायी समितीमधून सभापती विनोद मापारी, महापौर अर्चना मसने, अनिल गरड, नंदा पाटील, भारिप-बमसंच्या गटनेत्या अॅड. धनश्री देव यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत असल्याने ते निवृत्त होतील. तसेच शिवसेनेचे मंगेश काळे, राष्ट्रवादीचे फैयाज खान, काँग्रेसच्या नगरसेविका जैनबबी शेख इब्राहिम यांना पक्षाने एक वर्षासाठी संधी दिली होती. संबंधितांच्या जागेवर नवीन सदस्यांची वर्णी लागेल.
सभापती पद होणार रिक्त!स्थायी समितीचे विद्यमान सभापती विनोद मापारी यांचा समितीमधील दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मापारी सदस्य पदावरून निवृत्त होताच ‘स्थायी’चे सभापती पद रिक्त होणार आहे. सभापती पदावर निवड व्हावी, यासाठी भाजपमधील इच्छुकांना डोहाळे लागले आहेत. पक्षातील प्रत्येकालाच संधी मिळावी, असा पक्षश्रेष्ठींचा सूर असल्याने सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.