- आशिष गावंडे
अकाेला: मागील काही वर्षांपासून महापालिका क्षेत्रात भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी हाेत चालली आहे़. परिणामी सबमर्सिबल पंप, कूपनलिकांसाठी किमान शंभर ते दाेनशे फुटांपेक्षा अधिक खाेदकाम केल्यानंतरच पाण्याचे स्राेत आढळून येत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे़. ही धाेक्याची घंटा लक्षात घेता महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी शहरात विविध ठिकाणी ‘रिचार्ज शाफ्ट’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे़. तसे पत्र भूजल सर्वेक्षण विभागाला देण्यात आले आहे़
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात दैनंदिन पाण्याचा माेठ्या प्रमाणात वापर केला जाताे़ यामध्ये पाण्याची नासाडी हाेण्याचे प्रमाण माेठे आहे़ पावसाचे वाहून जाणारे पाणी, छतावरील पाणी तसेच घरगुती वापरातील सांडपाण्याचे पुनर्भरण करणे अपेक्षित असताना तसे हाेत नसल्याचे परिणाम शहरवासीयांना भाेगावे लागत आहेत़. मागील काही वर्षांत शहरातील संत तुकाराम चाैक परिसर, मलकापूर, काेठारी वाटिका, खडकी, जिल्हा परिषद काॅलनी, श्रद्धा काॅलनी, जठारपेठ परिसर, सातव चाैक परिसरासह विविध भागांतील सबमर्सिबल पंप, कूपनलिकांची भूजल पातळी कमी हाेत चालली आहे़. जलपुनर्भरणाची जबाबदारी सामूहिक असून, याचा नागरिकांना विसर पडल्याचे दुर्देवी चित्र आहे़.दरम्यान, ही बाब ध्यानात घेता महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात ‘रिचार्ज शाफ्ट’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे़. तसे पत्र भूजल सर्वेक्षण विभागाला देण्यात आले असून, या विभागाद्वारे शहरात सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती आहे़.
३ काेटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी
भूजल सर्वेक्षण विभागाकडून अत्यंत नियाेजनबद्धरीत्या तयार केल्या जाणाऱ्या ‘रिचार्ज शाफ्ट’साठी मनपा प्रशासनाने ३ काेटी रुपयांपर्यंत खर्च करण्याची तयारी सुरू केली आहे़ मनपाला प्राप्त १५ व्या वित्त आयाेगातून हा निधी प्रस्तावित केला जाईल़ त्यासाठी भूजल विभागाकडून शहरात सर्व्हे केला जाणार आहे़
सत्ताधाऱ्यांची सहमती
दिवसेंदिवस भूजल पातळीत घसरण हाेत चालली असून, ही चिंतेची बाब लक्षात घेता प्रशासनाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपने तातडीने सहमती दिली आहे़ या कामासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे़