अकाेला : महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना बदली हाेण्याचे संकेत मिळाल्यापासून त्यांनी महापालिकेकडे पाठ फिरविल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत वाढ झाली असून काही अधिकारी तणावात असल्याची माहिती आहे. दरम्यान, आयुक्तांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत अनेक विभागप्रमुख कर्तव्याला दांडी मारत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे प्रलंबित राहत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची गाडी रुळांवरून घसरली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये महापालिकेची सूत्रे स्वीकारणाऱ्या आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडून दर्जेदार विकासकामांची अपेक्षा हाेती. शहरातील अतिक्रमणाची समस्या, अस्वच्छता, पार्किंगचा अभाव, आदी समस्यांचे ते प्रभावीपणे निराकरण करतील, अशी अकाेलेकरांची भावना हाेती. सुरुवातीला आयुक्त कापडणीस यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी काही उपाययाेजना केल्या हाेत्या. त्यानंतर अनधिकृत बांधकामाला चाप लावण्याचा प्रयत्नही केला; परंतु कालांतराने कर्मचाऱ्यांना शिस्तीचा विसर पडला तर अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढल्याचे चित्र पाहावयास मिळाले. महापालिकेतील अनेक घाेळांचे चाैकशी अहवाल प्रलंबित असून त्यामध्ये प्रामुुख्याने सिमेंट रस्ते, शाैचालय घाेळासह सायकल खरेदी प्रकरण, हळदी-कुंकू प्रकरणातील आर्थिक अनियमितता, आदींसह अनेक घाेळांचा समावेश आहे. या संदर्भात आयुक्त कापडणीस यांच्याकडून ठाेस कारवाई अपेक्षित हाेती. आयुक्तांनी संबंधित दाेषी आढळून येणाऱ्यांविराेधात कारवाई का केली नाही, हा संशाेधनाचा विषय आहे. अशा स्थितीत आयुक्त कापडणीस यांना बदली हाेण्याचे संकेत मिळताच त्यांनी महापालिकेकडे पाठ फिरवणे पसंत केले आहे.
महापालिकेची उपायुक्तांवर दाराेमदार
आजराेजी महापालिका प्रशासनाची सर्व दाराेमदार प्रभारी उपायुक्त वैभव आवारे यांच्यावर असल्याचे दिसत आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून आवारे यांनी प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवले आहे. त्यांच्या पाठाेपाठ प्रभारी उपायुक्त पूनम कळंबे यांच्यामार्फत कामकाज निकाली काढले जात आहे. कामाचा ताण वाढल्याने दाेन्ही अधिकारी तणावात असल्याची चर्चा आहे.
‘व्हीसी’आटाेपून आयुक्त रवाना
मागील दाेन-चार दिवसांपासून आयुक्त संजय कापडणीस महापालिकेत सकाळी १० वाजता आल्यानंतर तास-दाेन तासांत घरी निघून जातात. मंगळवारी महापालिकेत दाखल झालेल्या आयुक्तांची विधान परिषद सदस्य गाेपीकिशन बाजाेरिया यांनी भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान आवास याेजनेच्या संदर्भात नगरविकास विभागातील सचिवांनी आयुक्तांसाेबत ‘व्हिडीओ काॅन्फरन्सिंग’ चर्चा केली. त्यानंतर आयुक्त घराकडे रवाना झाले.