अकोला:महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधील आठ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे १८ फेब्रुवारी राेजी नवीन आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे. काेराेनाच्या अनुषंगाने जिल्हाप्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे मनपात पहिल्यांदाच ऑनलाईनद्वारे सभेचे कामकाज पार पडणार असून आठ सदस्यांची निवड केली जाईल. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये १६ सदस्य असून यापैकी सत्ताधारी भाजपचे दहा सदस्य आहेत. उर्वरित शिवसेना व काँग्रेसचे प्रत्येकी दोन सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीप्रणित लाेकशाही आघाडीच्या दाेन सदस्यांचा समितीमध्ये समावेश आहे. समितीमधील आठ सदस्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येणार असल्याने या सदस्यांच्या जागेवर नवीन आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून काेराेनाच्या उद्रेकामुळे ही सभा ऑनलाईनद्वारे पार पडणार आहे.
बंद लिफाफे सादर करतील!
काेराेनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया आता माेबाईलद्वारे ऑनलाईन पध्दतीने पार पडेल. त्यापूर्वी भाजप,शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व काॅंग्रेसचे गटनेता निवड केल्या जाणाऱ्या सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात नगर सचिवांकडे सादर करतील. ही प्रक्रिया सकाळी १० वाजता पार पडेल.
यांची नावे चर्चेत
भाजपतर्फे सुनिता अग्रवाल, रंजना विंचनकर, साेनी आहुजा, अनुराधा नावकार, जान्हवी डाेंगरे, मंगला साेनाेने, शारदा ढाेरे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून प्रमिला गीते, राष्ट्रवादी,वंचित प्रणित लाेकशाही आघाडीतर्फे बबलू जगताप व काॅंग्रेसकडून पराग कांबळे किंवा इरफान खान यांची निवड केली जाऊ शकते.