- आशिष गावंडे
अकोला: महापालिकेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवड प्रक्रियेत भाजपाची सरशी झाली आहे. मनपाच्या मुख्य सभागृहात पाच पैकी चार सदस्यांकरीता निवड प्रक्रिया पार पडली असता भाजपाच्या ताब्यात तीन जागा गेल्या आहेत. उर्वरित एका जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेमुळे महापालिकेत भाजप नगरसेवकांचे संख्याबळ ५१ झाले आहे.महापालिकेच्या निवडणुकीत अकोलेकरांनी भाजपाला ८० जागांपैकी ४८ जागांवर विजयी क रीत एकहाती सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा करून दिला होता. सत्तापक्षाने १६ सदस्यीय स्थायी समितीचे गठन केल्यानंतर झोन निहाय सभापतींच्या नियुक्त्या केल्या. मागील आठ महिन्यांपासून पाच स्वीकृत सदस्य पदाची निवड प्रक्रिया रखडली होती. निकषानुसार सत्तापक्षाचे संख्याबळ लक्षात घेता भाजपाकडून तीन तर काँगे्रसच्या १३ संख्याबळानुसार एका सदस्याची वर्णी लागणार होती. उर्वरित एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत लोकशाही आघाडी व शिवसेनेचे संख्याबळ समान नऊ झाल्यामुळे तांत्रिक पेच निर्माण झाला होता. राष्ट्रवादीने शिवसेनेच्या आघाडीवर प्रश्नचिन्हं उपस्थित करीत नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेमुळे स्वीकृत सदस्य पदाच्या निवड प्रक्रियेवर संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दुर करण्याचे काम भाजयुमोचे पदाधिकारी गिरीश गोखले यांनी केले. याप्रकरणी गोखले यांनी नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली असता द्विसदस्यीय खंडपीठाने पाच पैकी एक सदस्यपदाला वगळून उर्वरित चार सदस्यांची निवड करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुषंगाने महापौर विजय अग्रवाल यांनी गुरुवारी स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते.
गटनेत्यांनी सादर केले लखोटेस्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त एस.राममुर्ती, प्रभारी उपायुक्त प्रा.संजय खडसे उपस्थित होते. दोन्ही अधिकाºयांच्या समक्ष भाजपाचे गटनेता राहूल देशमुख यांनी डॉ.विनोद बोर्डे, गिरीश गोखले व सुजीत ठाकूर यांच्या नावाचा तर काँग्रेसचे गटनेता साजीद खान पठाण यांनी विभा राऊत यांच्या नावाचा लखोटा महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे सादर केला.
मनपा आवारात आतषबाजीस्वीकृत सदस्य पदासाठी भाजपा व काँग्रेस उमेदवारांची निवड होताच मनपा आवारात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. नवनियुक्त नगरसेवकांनी खासदार संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्या दालनात नगरसेविका विभा राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
प्रस्ताव राजपत्रासाठी पाठविण्याचे निर्देशदोन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी सादर केलेले लखोटे महापौर विजय अग्रवाल यांनी उघडले. त्याचे वाचन भाजपाचे गटनेता राहूल देशमुख यांनी करीत नवनिर्वाचित नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. महापौर विजय अग्रवाल यांनी नवनियुक्त नगरसेवकांचे प्रस्ताव राजपत्रात नोंद करण्यासाठी शासनाकडे पाठविण्याचे निर्देश नगर सचिव अनिल बिडवे यांना दिले.