अकोला : महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीपदे रिक्त असल्यामुळे प्रशासनाचा डोलारा कोसळण्याच्या स्थितीत आहे. दोन उपायुक्त, मुख्य लेखा परीक्षकांची पदे रिक्त असून, दोन सहायक आयुक्त प्रदीर्घ रजेवर गेल्यामुळे प्रशासकीय कामाचा गाडा हाकण्याची जबाबदारी एकमेव आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यावर आली आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदासंदर्भात शासनाची एकूणच भूमिका पाहता भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा तोकडा पडत असल्याचे चित्र समोर आले आहे.गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत हातात सत्ता असण्याचा गवगवा करणाऱ्या भाजपाच्या काळातच महापालिकेत रिक्त असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदावर कोणीही नियुक्त होण्यास तयार नसल्याचे केविलवाणे चित्र पहावयास मिळत आहे. शहरात ‘अमृत’ योजनेच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे सुरू आहेत. अशास्थितीत कामे नियमानुसार निकाली निघणे अपेक्षित आहे. अर्थातच, या कामासाठी वरिष्ठ प्रामाणिक अधिकाऱ्यांची साखळी कार्यरत असणे गरजेचे आहे. या ठिकाणी नेमका उलटा प्रकार दिसून येत आहे. मनपाचे तत्कालीन उपायुक्त समाधान सोळंके कथित लाच प्रकरणात अडकले आणि त्यांचे निलंबन झाले. त्यानंतर मनपाचे मुख्य लेखा परीक्षक सुरेश सोळसे यांच्याकडे उपायुक्त (सामान्य प्रशासन विभाग) पदाचा प्रभार सोपविण्यात आला होता. सोळसे यांचे निधन झाल्यामुळे मुख्य लेखा परीक्षकांसह उपायुक्त (साप्रवि) पद रिक्त झाले आहे. मुख्य लेखा परीक्षकांचा प्रभार आनंद अवशालकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अर्थातच, उपायुक्तांची दोन पदे व मुख्य लेखा परीक्षकांचे एक पद रिक्त आहे. यात भरीस भर मनपाच्या सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, सहायक आयुक्त जितकुमार शेजव खासगी कामानिमित्त प्रदीर्घ रजेवर गेले आहेत. उपायुक्त, सहायक आयुक्तांची पदे रिक्त झाल्यामुळे संबंधित पदांचा प्रभार नेमका कोणाकडे सोपवणार, असा यक्ष प्रश्न आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.
शासनाकडे शिफारस केली पण...मुख्य लेखा परीक्षक, उपायुक्तांच्या रिक्त पदांसंदर्भात महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी शासनाकडे शिफारस केल्याची माहिती आहे. यासंदर्भात शासनाला तीन ते चार वेळा पत्र व्यवहार करून झाला. याव्यतिरिक्त भाजपाचे लोकप्रतिनिधी, महापौर विजय अग्रवाल यांनीसुद्धा शासनाकडे पत्र दिले आहेत. तरीही आजपर्यंत एकही वरिष्ठ अधिकारी नियुक्त न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी, महापौर व प्रशासनाच्या पत्रांची शासनाने कितपत दखल घेतली, याचा अंदाज येतो.