अकाेला: महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयांमधील जैविक घनकचऱ्याची उचल करून त्याची शास्त्राेक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. याकरिता अमरावती येथील ग्लाेबल इकाे सेव सिस्टीम एजन्सीची नियुक्ती करण्यात आली.
महापालिकेत ऑनलाइन प्रणालीनुसार स्थायी समितीच्या सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. सभेत प्रशासनाने सादर केलेल्या तीन प्रस्तावांवर मुद्देसूद चर्चा करण्यात आली. यामध्ये सन २०२०-२१ चे वार्षिक लेखे मंजूर करण्यासह भाडेतत्त्वावरील वाहनतळांचा प्रस्ताव व जैविक घनकचऱ्याच्या प्रस्तावाचा समावेश हाेता. महापालिका क्षेत्रातील जिल्हा सर्वाेपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालयासह सर्व खासगी हाॅस्पिटल, क्लिनिकमधून निघणाऱ्या जैविक घनकचऱ्याची शास्त्राेक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे क्रमप्राप्त आहे. तसे न केल्यास नागरिकांच्या जीविताला धाेका निर्माण हाेताे. यासंदर्भात मनपाच्या वैद्यकीय आराेग्य विभागाने निविदा प्रसिद्ध केली असता, तीन एजन्सीमार्फत निविदा प्राप्त झाल्या हाेत्या. यापैकी मनपाकडे राॅयल्टी देण्यासाठी सर्वाधिक पाच टक्के दराची निविदा सादर करणाऱ्या अमरावती येथील ग्लाेबल इकाे सेव सिस्टीम एजन्सीच्या नियुक्तीवर सभापती संजय बडाेणे यांनी शिक्कामाेर्तब केले.
शुल्क आकारणीचा अधिकार एजन्सीकडे!
शासकीय असाे वा खासगी रुग्णालयांमधून मानवी अवयव, सलाइन बाॅटल, सुया, रक्ताने माखलेले कपडे, प्लास्टिक कचरा माेठ्या संख्येने बाहेर निघताे. हा जैविक कचरा उघड्यावर साठवता येत नाही. या कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या एजन्सीकडूनच रुग्णालयांना शुल्क आकारणी केली जाणार आहे.
प्रक्रिया काेठे करणार?
जैविक घनकचऱ्यावर कुठे प्रक्रिया करणार, यावर प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी केली. त्यावर मनपाचे उपायुक्त वैभव आवारे यांनी शहरापासून ५० किमी अंतरावर प्रक्रिया प्रकल्प असून त्याठिकाणी विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती दिली.
रस्त्यात वाहनतळ; स्थायीची मंजुरी
बाजार विभागाने भाडेतत्त्वावर वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव सादर केला. यामध्ये मनपासमाेरील कवच आर्केड संकुलमागील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर वाहनतळ उभारण्याचा समावेश हाेता. या प्रस्तावाला राजेश मिश्रा, काँग्रेसचे माेहम्मद इरफान यांनी विराेध दर्शविला. रस्त्यात पार्किंग उभारण्याला माजी महापाैर विजय अग्रवाल यांचाही विराेध असताना हा प्रस्ताव सभापती संजय बडाेणे यांनी मंजूर केला.