अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविल्या जाणाºया मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून महापालिका शिक्षकांची नियुक्ती केली. मतदान केंद्रावर बीएलओ अनुपस्थित राहत असल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे. कामात दिरंगाई करणारे मनपाचे ५५ शिक्षक (बीएलओ) जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या रडारवर आले असून, त्यांच्यावर शनिवारी कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.वयाचे १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांसाठी मतदार यादीत नाव नोंदणी करून इतर सुधारणा करण्यासाठी निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत मतदार पुनरीक्षण कार्यक्रम निश्चित केला आहे. यासाठी महापालिका शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्त्या करीत मतदार नाव नोंदणीचे कार्य अनिवार्य करण्यात आले आहे. प्रभागांमध्ये मतदान केंद्रावर नियुक्त केलेले बीएलओ उपस्थित राहत नसल्याने मतदारांना हेलपाटे घ्यावे लागत असल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे. यासंदर्भात विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. कामात दिरंगाई करणाºया शिक्षकांना (बीएलओ) वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा होत नसल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्याकडून मनपाच्या सुमारे ५५ शिक्षकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.