- आशिष गावंडे
अकोला : डुकरांच्या माध्यमातून मानवी शरीरावर हल्लाबोल करणार्या एच-१, एन-१ या विषाणूंपासून स्वाइन फ्लू होतो, याची जाणीव असतानादेखील महा पालिकेचा आरोग्य विभाग झोपेत असल्याचे समोर आले आहे. गत पंधरवड्यात प्रभाग क्र.१, प्रभाग २, प्रभाग ८ तसेच प्रभाग १७ मध्ये मृत डुकरांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. यामुळे परिसरातीलच नव्हे, तर अकोलेकरांमध्ये स्वाइन फ्लूची धास्ती निर्माण झाली आहे. शहरासह जिल्ह्यात स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले असून, शहरात या आजाराचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. संबंधित रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू असले, तरी महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग तसेच स्वच्छता विभाग कवडीचाही गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वाइन फ्लूसाठी कारणीभूत मानल्या जाणारा एच-१, एन-१ या विषाणूंचे डुकरांच्या माध्यमातून संक्रमण होते. डुकरांना या विषाणूचा वाहक मानल्या जा ते. या आजारासाठी थंडीचे दिवस पोषक मानले जातात. त्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रसार झपाट्याने होण्याची दाट शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून शहरात मृत डुकरांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. नायगावस्थित डम्पिंग ग्राउंड परिसरात डुकरांची कलेवरे आढळून आली आहेत. प्रभाग १, प्रभाग २, प्रभाग ८ तसेच प्रभाग १७ मध्ये सार्वजनिक जागेवर मृत डुकरांना फेकून दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. निर्जन ठिकाणी किंवा झाडाझुडपात मृत डुकरांची कलेवर दिसत असून, त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वाइन फ्लूची चिन्ह पाहता सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट
शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असताना मनपाकडून मृत डुकरांची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज आहे. तसे न करता काही आरोग्य निरीक्षक डुकरांची थेट डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावत असून, काही बहाद्दर चक्क उघड्यावर फेकून पसार होत असल्याची माहिती आहे. यामुळे स्वाइन फ्लूच्या संक्रमणाचा धोका बळावण्याची शक्यता आहे.
डुकरे पकडण्याचा कंत्राट विरला!
मोकाट डुकरांना पकडून शहराबाहेर हलविण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी निविदा प्रकाशित करून कंत्राटदार नियुक्त केला होता. महापौर विजय अग्रवाल यांच्या प्रभागातून डुकरे पकडण्याला सुरुवातही केली होती. नंतर काही वराह पालकांनी कंत्राटदाराला मारहाण करून त्याला पळवून लावले. तेव्हापासून डुकरे पकडण्याचा कंत्राट हवेत विरल्याचे दिसून येते.
शहरात कोठेही मृत जनावर आढळल्यास त्याची तातडीने शहराबाहेर विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे. मोकाट डुकरांच्या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले जा तील. कोणाचाही मुलाहिजा बाळगला जाणार नाही. -विजय अग्रवाल, महापौर