अकोला : ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत महापालिका क्षेत्रात ‘हीरकमहोत्सवी अभियान’ राबविण्याचे शासनाचे निर्देश असले तरी मनपातील स्वच्छता व आरोग्य विभागाच्या स्तरावर सदर अभियान कागदावर असल्याचे दिसून येत आहे. साफसफाईच्या कामांसाठी मनपाकडे पुरेसे संख्याबळ असले तरी त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले आरोग्य निरीक्षक ढिम्म असल्याचे चित्र आहे. या अभियानासंदर्भात शासनाचे स्पष्ट निर्देश असले तरी मनपाचा ढिसाळ कारभार पाहता स्वच्छ महाराष्ट्र अभियान दावणीला बांधल्याचे समोर आले आहे.१ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरकमहोत्सव साजरा केला जाणार असून, यानिमित्ताने स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी १ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत महापालिका क्षेत्रात ‘हीरकमहोत्सवी नागरी महाराष्ट्र स्वच्छता अभियान’ राबविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शासनाने जारी केलेल्या पत्रकानुसार महापालिकेने स्वच्छता राखण्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. यामध्ये नाले- गटारांची साफसफाई ठेवण्यासोबतच कचरा टाक ण्याच्या ठिकाणी सौंदर्यीकरण करणे, महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासह शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी उपाय करण्याची सूचना आहे. शासन निर्देशानुसार काम करण्यासाठी मनपाकडे पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध असल्याने सदर आव्हान प्रशासन कशा प्रकारे स्वीकारते, याकडे लक्ष लागले आहे.जाहिरात फलक हटवा!शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा आणणारे होर्डिंग, बॅनर तातडीने हटविण्याचे निर्देश आहेत. शहरातील मोजक्या जागांची निवड करून त्याच ठिकाणी जाहिरातींना मुभा देण्याचे निर्देश आहेत. उद्यानांचे सौंदर्यीकरण करून लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांसाठी मनोरंजनाची साधने उपलब्ध करणे क्रमप्राप्त आहे.फेरीवाला धोरणाची अंमलबजावणीशहरातील वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या लघुविके्रत्यांसह फेरीवाल्यांसाठी धोरण निश्चित करणे गरजेचे आहे. मनपाने ‘हॉकर्स झोन’ तसेच ‘नो हॉकर्स झोन’ निश्चित करून त्याचे पालन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.मनपाकडे नियोजनाचा अभाव‘हिरकमहोत्सवी’अभियान राबविताना शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांपैकी महापालिकेचा स्वच्छता व आरोग्य विभाग कितपत पालन करतो, यावरच शहराची स्वच्छता व साफसफाई अवलंबून आहे. तूर्तास मनपाकडे नियोजनाचा अभाव असून, त्यावर आयुक्त संजय कापडणीस कसा तोडगा काढतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.