अकोला: महापालिकेत मानधन तत्त्वावर कार्यरत मानसेवी कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून मुदतवाढ मिळाली नसून, त्यांचे मानधन थकीत असल्याचे चित्र आहे. अत्यल्प मानधनात सेवा बजावणाºया मानसेवी कर्मचाºयांना तातडीने मुदतवाढ देण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.महापालिकेत मागील २२ वर्षांपासून मानसेवी कर्मचारी कार्यरत आहेत. कायद्याचा आधार घेऊन त्यांनी महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी करण्याच्या मागणीची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून मानसेवी कर्मचाºयांना दर चार महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. तसा प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे सादर करावा लागतो. अत्यल्प मानधनात सुमारे १६० पेक्षा अधिक मानसेवी कर्मचारी विविध विभागात कार्यरत आहेत. सर्वसामान्य अकोलेकर असो वा मनपाचे पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवकांच्या रोषाचा त्यांना अनेकदा सामना करावा लागतो. सदर कर्मचाºयांची मुदतवाढ ५ आॅक्टोबर २०१८ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर प्रशासनाने त्यांना मुदतवाढ देणे अपेक्षित होते. तसे न झाल्यामुळे प्रशासनाच्या आदेशाशिवाय संबंधित कर्मचारी मनपात सेवा बजावत आहेत. त्यांच्या तीन महिन्यांचे मानधनही थकीत असल्याने अडचणीत वाढ झाली आहे. ही बाब भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित कर्मचाºयांना मुदतवाढ देण्यासंदर्भात मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना पत्र दिले आहे.शिक्षण विभागाला विसरतत्कालीन नगर परिषदेच्या कार्यकाळात १९९२-९३ मध्ये शिक्षण विभागात अस्थायी तत्त्वावर कला शिक्षकांची नियुक्ती झाली होती. अर्थात, त्यांना दर सहा महिन्यांनंतर मुदतवाढ देण्याची गरज होती. तसे न झाल्यामुळे यातील ११ कला शिक्षकांनी जाणीवपूर्वक नागपूर खंडपीठात वैयक्तिक याचिका दाखल करून इप्सित साध्य करून घेतले होते. या प्रकरणाची महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी गंभीर दखल घेत नागपूर खंडपीठातून सदर प्रकरण निकाली काढले होते, तसेच संबंधित अस्थायी कला शिक्षकांची सेवा समाप्त केली होती, हे येथे उल्लेखनीय. संबंधित कला शिक्षकांनी आता पुन्हा एकदा नियुक्तीसाठी प्रशासनाकडे प्रयत्न चालविल्याची माहिती आहे.