लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिवणी-मलकापूर प्रभागातील भाजपाचे नगरसेवक विशाल श्रावण इंगळे यांची मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाचे विशाल इंगळे यांच्या विरोधात एकही अर्ज नसल्यामुळे इंगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारिप-बमसंच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडणा-या विशाल इंगळे यांच्या निमित्ताने भाजपानेसुद्धा मनपाच्या राजकारणात ‘सोशल इंजिनिअरिंग’चा यशस्वी प्रयोग केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पार पडली. ‘स्थायी’च्या सभागृहात विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय उपस्थित होते. स्थायी समितीत भाजपाचे दहा सदस्य असून, उर्वरित दोन काँग्रेस, दोन शिवसेना व राष्ट्रवादीप्रणीत लोकशाही आघाडीच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. १२ मार्च रोजी सभापती पदाचा अर्ज घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुढाकार घेतला होता. मंगळवारी सकाळी ११ वाजता अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असता एकाही सदस्याने सभापती पदासाठी अर्जच सादर केला नसल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे भाजपाचे विशाल इंगळे यांच्या अविरोध निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सभापती विशाल इंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
उद्यापासून कामकाज सुरूस्थायी समितीच्या सभापती पदावर विराजमान झालेल्या विशाल इंगळे यांचे महापौर विजय अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी बुधवारपासूनच सभापती पदाचे कामकाज सुरू करणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले. याप्रसंगी उपमहापौर वैशाली शेळके, मावळते सभापती बाळ टाले, सभागृह नेत्या गीतांजली शेगोकार, सुमनताई गावंडे, सुनीता अग्रवाल, शारदा ढोरे, अर्चना मसने, रंजना विंचनकर, आरती घोगलिया, जान्हवी डोंगरे, अनिता चौधरी, जयश्री दुबे, सुजाता अहिर, पल्लवी मोरे, चंदा शर्मा, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, सतीश ढगे, आशिष पवित्रकार, मिलिंद राऊत, अजय शर्मा, अनिल गरड, डॉ. विनोद बोर्डे, सुनील क्षीरसागर, तुषार भिरड, धनंजय धबाले, अमोल गोगे, विजय परमार, विनोद मापारी, सुजित ठाकूर, प्रशांत अवचार, सुनील बाठे, अनुप गोसावी, अभिजित बांगर, अनिल मुरूमकर, वैकुंठराव ढोरे आदींनी नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागासह शहरवासीयांना मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासह विकास कामांची गती वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. मनपासह राज्य व केंद्रात भाजपाची सत्ता असल्यामुळेच शहरातील विकास कामांसाठी निधीचा ओघ सुरू आहे. -विशाल इंगळे, सभापती, स्थायी समिती मनपा.