अकोला: महापालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त जागा दिसेल तिथे होर्डिंग्ज, बॅनर, फलक, झेंडे व पताका लावणार्या अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एकूण १३ उमेदवारांना १0 ऑक्टोबर रोजी मनपाने नोटीस बजावल्या. मनपा क्षेत्रातील अकोला पूर्व व अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार्या उमेदवारांना होर्डिंग्ज, बॅनर, फलक उभारण्यासाठी प्रशासनाने नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. मनपा क्षेत्रात व्यावसायिक जाहिरातींसाठी १३0 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित जागेवरच उमेदवारांनी होर्डिंग्ज, फलक लावणे बंधनकारक आहे. जाहिरातीसाठी सहा रुपये प्रती चौरस फूटप्रमाणे दर आकारणी करण्यात आली. अकोला पूर्व व अकोला पश्चिम मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकार्यांनी होर्डिंग्ज, बॅनर, फलक, झेंडे व पताका लावण्यासाठी संबंधित उमेदवारांना परवानगी दिल्यानंतर पुढील सोपस्कार मनपा प्रशासनाने पार पाडले; परंतु बहुतांश सर्वच उमेदवारांनी मनमानी पद्धतीने शहरातील प्रमुख चौक, रस्ते, सरकारी जागा, व्यावसायिक इमारतींवर होर्डिंग्ज, बॅनर व फलक उभारले. ही बाब संबंधित मतदारसंघातील निरीक्षकांच्या निदर्शनास येताच, त्यांनी मनपाला सूचना दिल्या. त्यानुसार मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी १३ उमेदवारांना नोटीस जारी केल्या. यामध्ये अकोला पूर्व मतदारसंघातील हरिदास भदे, पुष्पा इंगळे, सुभाषचंद्र कोरपे, विजय मालोकार, शिरीष धोत्रे, रणधीर सावरकर, गोपीकिशन बाजोरिया, तसेच अकोला पश्चिम मतदारसंघातील विजय देशमुख, गुलाबराव गावंडे, गोवर्धन शर्मा, पंकज साबळे, आसीफ खान मुस्तफा खान, उषा विरक यांचा समावेश आहे.
तेरा उमेदवारांना अकोला मनपाची नोटीस
By admin | Published: October 11, 2014 1:29 AM