अकोला : महापालिकेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचार्यांची पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम, कालबद्ध पदोन्नती, थकीत वेतन आदी विविध मुद्यांवर पुन्हा एकदा मनपा कर्मचारी संघर्ष समितीने संपाचे हत्यार उपसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. संघर्ष समितीच्या मागण्यांवर सकारात्मक विचार न केल्यास येत्या ४ जूनपासून संप पुकारण्याचा इशारा कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला. मनपातील सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचार्यांना अद्यापही पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अदा करण्यात आली नाही. सेवानिवृत्त कर्मचार्यांना ही रक्कम देय करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आजारी कर्मचार्यांना उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. कालबद्ध पदोन्नतीसह थकीत वेतनाची समस्या कायम आहे. शहरात साफसफाईची कामे करण्यासाठी मनपाच्या आस्थापनेवरील उपलब्ध कर्मचारी संख्या पुरेसी नसल्याने किमान ३०० कर्मचार्यांची नियुक्ती करणे गरजेचे झाले आहे. कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्यात प्रशासन कुचकामी ठरत आहे, याबाबीचा कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर प्रशासनाला ४ कोटींचे अनुदान शासनाकडून मंजूर झाले होते. सदर अनुदानातून पाचव्या वेतनाची समस्या निकाली निघण्यास मदत होईल. यामुळे या विषयावर प्रशासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा ४ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा मनपा कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. ** एलबीटीच्या उत्पन्नात वाढ नाहीच!२० एप्रिल ते २० मेपर्यंत स्थानिक संस्था कर विभागाला ३ कोटी ५८ लाख रुपये प्राप्त झाले. मार्च महिन्यात हीच वसुली ४ कोटी २० लाखापर्यंत पोहोचली होती. एलबीटी रद्द होण्याच्या शक्यतेने व्यापार्यांमध्ये निरुत्साह आहे. तर ही बाब एलबीटी विभागातील अधिकारी-कर्मचार्यांच्या पथ्यावर पडत आहे. एका कर्मचार्याला गुटखा विके्रत्यांकडून किमान ४० हजारांचा हप्ता प्राप्त होत असल्याची माहिती आहे. या गैरप्रकाराला आळा घालण्यात आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांना सपशेल अपयश आल्याचे चित्र आहे.
अकोला महापालिका कर्मचारी पुन्हा संपावर?
By admin | Published: May 28, 2014 9:49 PM