अकोला: तापडियानगर स्थित मोहन भाजी भंडारजवळ मोकाट कुत्री पकडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कंत्राटदारासह सुरक्षा रक्षकाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकाराची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने मारहाण करणार्या धीरेंद्र तिवारी, भोला तिवारी यांच्याविरोधात रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत तिवारी यांच्या अनधिकृत इमारतीला जमीनदोस्त करण्यासह रस्त्यावर बांधलेल्या दुधाळ जनावरांची कोंडवाड्यात रवानगी केली.शहरात मोकाट कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे वैतागले आहेत. यातही शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे कोंडवाडा विभागाला आदेश जारी केले असून, कंत्राटदारामार्फत मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम शहरात राबविली जात आहे. तापडियानगर स्थित मोहन भाजी भंडारजवळ मोकाट कुत्री पकडण्यासाठी कोंडवाडा विभागप्रमुख सुरेश अंभोरे, कंत्राटदार जागेश्वर गोमासे व सुरक्षा रक्षक रमेश चक्रनारायण बुधवारी दुपारी गेले असता, त्यांना परिसरातील धीरेंद्र तिवारी व भोला तिवारी यांनी आडकाठी केली. पकडलेले मोकाट कुत्रे आमच्या घरचे असल्याचे सांगत तिवारी बंधूंनी मनपाच्या कारवाईला अडथळा निर्माण केला. एवढय़ावरच न थांबता चक्क कंत्राटदार जागेश्वर गोमासे व सुरक्षा रक्षक रमेश चक्रनारायण यांच्यावर लोखंडी पाइप, फावड्याने हल्ला चढवला.यामध्ये कंत्राटदार गोमासे आणि सुरक्षा रक्षक चक्रनारायण यांना जबर दुखापत झाली. मनपाचे शासकीय वाहन क्र.एमएच ३0-एच-५0२८ ची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी कोंडवाडा विभागप्रमुख सुरेश अंभोरे यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात धीरेंद्र तिवारी व भोला तिवारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली.
अकोला महापालिकेच्या कर्मचा-यांवर हल्ला
By admin | Published: February 25, 2016 1:38 AM