लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाळूचा अवैधरीत्या उपसा करून चोरीच्या मार्गाने वाहतूक करणारी चार ट्रक व दोन ट्रॅक्टर पकडल्यानंतर, सात चालक आणि पाच वाहन मालकांवर फौजदारी कारवाईची तक्रार विशेष पथकाने महसूल विभागाला दिली. महसूल विभागाने हीच तक्रार अकोट फैल पोलीस ठाण्यात दिली. मात्र, अकोट फैल पोलिसांनी या तक्रारीतून वाहन मालकांची नावे परस्पर वगळल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. सदर प्रकरण पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहाचले असून, त्यांनी चौकशी सुरू केली आहे. म्हैसांग ते अकोला या मार्गावर वाळूचा अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करणार्या चार ट्रक व दोन ट्रॅक्टरवर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी घुसर ते अकोट फैलदरम्यान पाळत ठेवून कारवाई केली. यावेळी मोठी उमरी येथील रहिवासी मनीष गिरी, सतीश सुळे, गणेश गंगागीर गिरी, सुभाष गावंडे, अमीनभाई लोदी आणि आरीफ भाई या सहा वाहनमालकांसह योगेश नागोराव बोपटे, प्रकाश चिंतामण वानखडे, हबीब शाह अकबर शाह मदारी, भरत चंद्रकांत नाचरू, प्रमोद अशोक वदे आणि दीपक मंगल बदराशे यांच्यावर पाळत ठेवून चार ट्रक आणि ट्रॅक्टर जप्त केले. तब्बल २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर सदर १२ जणांविरुद्ध विशेष पथक आणि महसूल विभागाने अकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, अकोट फैल पोलिसांनी यामध्ये मोठी दुकानदारी करीत, सहा वाहनचालक व विशेष पथकाने पकडलेल्या मनीष गिरीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच वरिष्ठांना अंधारात ठेवत अर्थकारणातून सतीश सुळे, गणेश गंगागीर गिरी, सुभाष गावंडे, अमीनभाई लोदी आणि आरीफ भाई या पाच वाहन मालकांची नावे परस्पर वगळली. अकोट फैल पोलिसांचा हा प्रताप पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचला असून, त्यांनी चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.
प्रकरण निपटण्यासाठी प्रयत्नअकोट फैल पोलिसांनी वाळूची चोरी करणार्या वाहन मालकांची नावे टाकून प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दाखल झालेल्या गुन्हय़ात या वाळू माफियांची नावे काढण्यात आली आहेत. प्रकरण अंगाशी येत असल्याचे निदर्शनास येताच या वाहनमालकांची नावे तपासात जोडल्या जाऊन त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अकोट फैल पोलिसांनी केलेला प्रकार हा ‘बुंद से गई ओ हौद से नही आती’ असाच असल्याचे दिसून येत आहे.
शिंदे-पवारने भरविली शाळा!महसूल विभागातील शिंदे आणि अकोट फैल पोलीस ठाण्यातील पवार नामक कर्मचार्याने वाहन मालकांची नावे वगळण्यासाठी मोठी शाळा भरवल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तक्रार न वाचताच गुन्हा दाखल केल्याचे या दोघांचेही म्हणणे असले, तरी केवळ मालकांचीच नावे वगळण्याचा खटाटोप यांनी कसा केला, हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, पोलीस खात्यावर मोठा डाग लागण्याची शक्यता या प्रकारामुळे वर्तविल्या जात आहे.
महसूलचे मोठे अधिकारी सहभागीमहसूल विभागाच्या मोठय़ा अधिकार्यांच्या संगनमताने वाळूचा अवैधरीत्या उपसा सुरू असल्याची कबुली यामधीलच काही वाळू माफियांनी पोलिसांसमोर दिली आहे. यावरून वरिष्ठ अधिकारीही संशयाच्या घेर्यात सापडले असून, या सर्वांची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
१0 लाखांवर जातोय हप्ता!महसूल विभागाच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना वाळू माफियांकडून तब्बल १0 लाखांवर हप्ता देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द वाळू माफियांकडूनच हे बोलले जात असून, पोलीस कारवाईला आळा घालण्यासाठीही महसूलचे अधिकारी पुढाकार घेत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. वाळू माफियांना मोकळे रान करण्यासाठी महसूल विभागाला तब्बल १0 लाखांवर हप्ता जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
तलाठी-मंडळ अधिकारी घेर्यात!वाळूचे ट्रक पकडल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी कारवाई न करण्यासाठी मंडळ अधिकारी तसेच तलाठय़ांकडूनच पोलिसांना प्रस्ताव देण्यात येत असल्याचेही या प्रकारामुळे उघड झाले आहे. मंडळ अधिकारी व तलाठय़ांनी या माध्यमातून मोठी माया गोळा केली असून, यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी होत आहे. चोरट्या मार्गाने वाळू उपसण्यास तलाठी व मंडळ अधिकार्यांची मूक संमती असल्याचे बोलले जात आहे.-