अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कामठा येथील रहिवासी एक युवक देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन अशोक वाटिका चौकात असल्याची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या पथकाने छापा टाकून युवकास मंगळवारी सकाळी अटक केली. तीस हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.मूर्तिजापूर तालुक्यातील कामठ येथील रहिवासी राजेश अवधूत ठोंबरे (३५) हा अशोक वाटिका चौकातील गढिया हॉस्पिटलसमोर कमरेत देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस घेऊन असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांना मिळाली. त्यांनी तातडीने पथकाला कामाला लावून युवकास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची झडती घेतली असता युवकाच्या कमरेजवळ ठेवलेला देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त केले. या साहित्याची किंमत सुमारे ३०००० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर आरोपीविरुद्ध २५ आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राहुल धस, पथकाचे राजू वाकोडे, मनोज ठोसर, राज चंदेल, विनय जाधव यांनी केली.