लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: प्रसूतीसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेला आधी मुलगा झाल्याचे सांगण्यात आले; परंतु थोड्या वेळाने हातात मुलगी देण्यात आली. या प्रकारामुळे सर्वोपचार रुग्णालयात शनिवार, ५ मे रोजी चांगलाच गोंधळ उडाला. रुग्णालयातील एका अज्ञात महिला कर्मचाºयाने बक्षिसीच्या हव्यासापोटी मुलगा झाल्याचे सांगितल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाल्याचे समोर आले. त्यानंतर कक्षातील डॉक्टरांनी दाम्पत्यास मुलगीच झाल्याची शहनिशा करून दिली आणि या गोंधळावर पडदा पडला.गोरगरीब रुग्णांसाठी हक्काचे स्थान असलेले येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गत काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांसाठी चर्चेच्या झोतात आले आहे. सफाई कर्मचाºयाकडून रुग्णाच्या महिला नातेवाइकास रक्ताच्या मोबदल्यात शरीरसुखाची झालेली मागणी व अर्भक उघड्यावर फेकण्याच्या घटना सर्वोपचार रुग्णालयात घडल्या आहेत. यामध्ये आणखी भर टाकणारा प्रकार शनिवारी घडला. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका गर्भवती महिलेला तिच्या नातेवाइकांनी प्रसूतीसाठी सर्वोपचार रुग्णालयात आणले. स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वार्ड क्र. २ मध्ये सदर महिलेला भरती करण्यात आले. शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास महिलेची सिझेरियन प्रसूती करण्यात आली. त्यानंतर एका महिलेने प्रसूत झालेल्या महिलेच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याची माहिती दिली. एवढेच नव्हे, तर बक्षिसी म्हणून पैसेही घेतल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. त्यानंतर थोड्या वेळाने महिलेच्या हातात बाळ म्हणून मुलगी देण्यात आली. मुलगी पाहताच नातेवाइकांनी गोंधळ घातला. आम्हाला मुलगा झाल्याचे सांगण्यात आले होते, आता मुलगी कुठून आली, असा प्रश्न करीत नातेवाइकांनी डॉक्टरांना जाब विचारला. यावेळी शस्त्रक्रिया कक्षात उपस्थित असलेल्या डॉक्टर व अधिपरिचारिकांनी नातेवाईकांना समजवून सांगितले. तसेच त्यांना मुलगीच झाल्याची पडताळणीही करून दिली. यासंदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांना तक्रार करण्यासही सांगितले; परंतु नातेवाइकांनी कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर हा गोंधळ मिटला.
नातेवाइकांची तक्रार नाहीमहिलेच्या नातेवाइकांना मुलगा झाल्याचे सांगून बक्षिसी उकळणाºया महिलेची तक्रार करण्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टर किंवा अधिपरीचारिकांनी मुलगा झाल्याचे सांगितले होते का, असा प्रश्न यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी नातेवाइकांना केला; परंतु नातेवाइकांनी त्या महिलेला ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच या संदर्भात लेखी तक्रार देण्यासही नकार दिल्याचे रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.