- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात वन जंगलाचे प्रमाण वाढविण्यासाठी डोंगराळ भागात हेलिकॉप्टरद्वारे बियाणे फेकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गत दोन वर्षांपासून प्रयत्न चालविला. त्या प्रयत्नाला यावर्षीही सुरुंग लावण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या मंजूर अर्थसंकल्पातून झाला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प पदाधिकाऱ्यांऐवजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे. त्यावर पुढील सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.पर्यावरणातील विविध समस्या जंगलाचे प्रमाण घटल्यामुळे निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणून शासनाकडून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यातून फारसे काही हातात पडत नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीऐवजी जंगलातच झाडांचे प्रमाण वाढवून जंगल क्षेत्र व वनाच्छादन वाढविण्याची संकल्पना गत काही वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांना सांगितली. जंगलात हेलिकॉप्टरद्वारे बियाणे फेकण्यासाठी (सीड बॉम्बिंग) जिल्हा परिषदेच्या विभागाकडे निधीची तरतूद करावी, पावसाळ्यात हा प्रयोग राबवावा, यासाठीचे नियोजनही झाले; मात्र यापूर्वी निधीची तरतूद महिला व बालकल्याण विभागाकडे करण्यात आली. त्या विभागाच्या आयुक्तांनी हा उपक्रम विभागाकडून राबविता येणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तो कागदावरच राहिला. ती वेळ यावर्षी पुन्हा येऊ नये, यासाठी नव्याने नियुक्त पदाधिकाºयांनी खबरदारी घेत जिल्हा परिषदेच्या कृ षी विभागाकडून ही योजना राबविण्याची तयारी केली. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याचेही ठरले. तसे झाल्यानंतर मंजूर अर्थसंकल्पात केवळ एक हजार रुपये टोकन ठेवण्यात आले. हा प्रकार सत्ताधारी पदाधिकाºयांच्या निर्णय तसेच त्या पक्षाच्या नेत्यांच्या संकल्पनेला पुरता सुरुंग लावणारा ठरला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदांच्या अर्थसंकल्पीय सभा शासनाने रद्द केल्या. त्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अर्थसंकल्प मंजूर करावा, तसेच येणाºया सर्वसाधारण सभेपुढे ठेवावा, असेही निर्देश दिले. त्यानुसार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी मंजूर केलेल्या अर्थसंकल्पात हा प्रकार घडला आहे.
आता निधी वळविण्याचा तिढा
‘सीड बॉम्बिंग’साठी एक हजार रुपये टोकन तरतूद आहे. त्यासाठी निधी वळता करावा लागणार आहे. शिक्षण विभागाच्या काही उपक्रमांचा २५ ते ३० लाखांचा निधी त्यासाठी वळता करण्याची तयारी सत्ताधाºयांकडून होणार आहे; मात्र आधीच तरतूद केली असती तर हा प्रकार घडला नसता, यामुळे आता सत्ताधारी चांगलेच संतप्त झाले आहेत. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांच्याशी पदाधिकाºयांनी रक्तदान शिबिरप्रसंगी चर्चा केली.
अर्थसंकल्पात अनेक फेरबदलाने सत्ताधाºयांना डिवचले!
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांनी मंजूर केलेल्या तरतुदी, त्यानुसार अर्थ समितीने केलेल्या तरतुदी, अर्थ विभागानंतर शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरापर्यंत अर्थसंकल्पात अनेक फेरबदल झाले. त्यातून सत्ताधाºयांना डिवचण्याचाच प्रकार घडल्याची चर्चा आता जोर धरत आहे.