लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडलेल्या हत्याकांड व प्राणघातक हल्ला प्रकरणातील सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील अटकेत असलेल्या तीन आरोपींना अमरावती येथील मकोकाच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या तीनही आरोपींना विशेष न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यामध्ये अश्विन उद्धवराव नवले, सागर कृष्णसा पुर्णये, राहुल खडसान या तिघांचा समावेश आहे. जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या शिवसेना वसाहतमधील रहिवासी तुषार नागलकर यांच्या घरी १४ डिसेंबरच्या मध्यरात्री मद्य प्राशन करून शैलेश अढाऊ, अश्विन नवले, सागर पुर्णये, राहुल खडसान, मंगेश टापरे, आशिष वानखडे व किशोर वानखडे यांच्यासह आणखी काही युवकांनी हैदोस घालून नागलकरला शिवीगाळ करीत मारहाण केली होती. या प्रकरणात तुषार नागलकर व त्याच्या भावडांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात शैलेश अढाऊ याचा मृत्यू झाला होता, तर तुषार नागलकरही गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटाविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नागलकरवरील हल्ला प्रकरणात आरोपी असलेल्या किशोर वानखडे, अश्विन नवले, सागर पुर्णये, राहुल खडसान, मंगेश टापरे, आशू वानखडे यांच्या गुन्हेगारी पृष्ठभूमीच्या तक्रारी थेट पोलीस अधीक्षकांकडे झाल्या. त्यांनी सदर सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे यांच्याकडे पाठविल्यानंतर त्यांनी मकोका कारवाईच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर सहापैकी अटकेत असलेल्या सागर पुर्णये, राहुल खडसान, अश्विन नवले या तिघांना मकोकाच्या अमरावती येथील विशेष न्यायालयात हजर केले, न्यायालयाने तीनही आरोपींना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
तिघांच्या जामीन रद्दसाठी प्रयत्नकिशोर सुधाकर वानखडे, आशिष शिवकुमार वानखडे, मंगेश टापरे या तीन आरोपींची जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. मात्र, या तीन आरोपींवर आता मकोकाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस न्यायालयात जाणार आहेत. या तीन आरोपींचा जामीन रद्द करून त्यांना मकोकाच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली.