अकोला : अकोला पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. त्यामध्ये पाच रिक्त जागांपैकी तीन जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असून, उर्वारित दोन रिक्त जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून (ओबीसी) निवडून आलेल्या अकोला पंचायत समितीच्या पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पाच जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार असून, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे रिक्त जागांसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाच्या आरक्षणाची सोडत अकोला तहसील कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. त्यामध्ये पंचायत समितीच्या पाच रिक्त जागांपैकी तीन जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे जाहीर करण्यात आले असून उर्वरित दोन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे निश्चित करण्यात आले. अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीला संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पाच जागांचे गण व प्रवर्गनिहाय
असे आहे आरक्षण!
गण प्रवर्ग
दहिहांडा सर्वसाधारण
घुसर सर्वसाधारण स्त्री
पळसो सर्वसाधारण स्त्री
कुरणखेड सर्वसाधारण स्त्री
चिखलगाव सर्वसाधारण
माजी सभापती नागे यांचा गण
सर्वसाधारण महिलांसाठी राखीव!
‘ओबीसी’ प्रवर्गातून निवडून आलेल्या अकोला पंचायत समितीच्या पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामध्ये अकोला पंचायत समितीचे सभापती वसंतराव नागे यांचा समावेश आहे. मंगळवारी पंचायत समितीच्या रिक्त पाच जागांचे आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये माजी सभापती वसंतराव नागे यांचा पळसो पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला. त्यामुळे या गणातून निवडणूक लढण्यासाठी माजी सभापती नागे यांची पंचाइत झाली आहे.