अकोला : भारत वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक तथा समाजसेवक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यात प्रारंभ झालेल्या एक विद्यार्थी - एक वृक्ष माेहीम आता चांगलीच फोफावली आहे. अकोला जिल्ह्यातून मुहूर्तमेढ रोवला गेलेला वृक्षारोपणाचा हा पॅटर्न आता इतर जिल्ह्यांमध्येही पोहोचला असून, लातूर व बुलडाणा जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहिमेस प्रारंभ झाला आहे. मूळचे तामिळनाडू राज्यातील ए. एस. नाथन हे गत सात ते आठ वर्षांपासून भारत वृक्ष क्रांती मिशनअंतर्गत वृक्षलागवड व संवर्धनाचे प्रयोग करीत आहेत. या मोहिमेची सुरुवात त्यांनी अकोला जिल्ह्यात केली. तेव्हापासून वृक्षलागवडीचा हा उपक्रम अकोला पॅटर्न म्हणून ओळखला जातो. प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने एका वृक्षाची लागवड करून, त्याचे संगोपन करावे, असा हा उपक्रम आहे. अकोला जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. वृक्षसंवर्धनाचा हा उपक्रम नाथन यांनी आता बुलडाणा, वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या जिल्ह्यांमध्येही राबविण्याचे ठरविले असून, त्यादृष्टीने शासकीय यंत्रणेचे पाठबळही त्यांना मिळाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात १५ ऑगस्ट रोजी या मोहिमेस प्रारंभ झाला असून, पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातही या मोहिमेस प्रारंभ झाला असून, येत्या महिनाभरात नांदेड, हिंगोली, परभणी व वाशिममध्येही या मोहिमेस सुरुवात होणार असल्याचे नाथन यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
२५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
या मोहिमेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात ५ लाख १४ हजार, लातूर जिल्ह्यात ५ लाख ५० हजार, नांदेड जिल्ह्यात सात लाख, परभणी जिल्ह्यात चार लाख, तर वाशिम व हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी दोन लाख असे एकूण २५ लाखांवर वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.