संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेनंतर लोकसहभागातून दोन वर्षांत मोर्णा नदीचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी नदीकाठाचा विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचा ‘अँक्शन प्लॅन’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तयार केला आहे. जिल्हा प्रशासन व शहरातील विविध सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, कर्मचारी संघटनांसह लोकसहभागातून गत १३ आणि २0 जानेवारी रोजी राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दर शनिवारी राबविण्यात येणारी मोर्णा नदी स्वच्छता मोहीम आणखी दोनदा राबविण्यात येणार आहे. नदीतील जलकुंभी आणि कचरा काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, अकोल्यातील नागरिकांच्या सहभागातून दोन वर्षांत मोर्णा नदीचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी मोर्णा नदीकाठाचा विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामाचा ‘अँक्शन प्लॅन ’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी तयार केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नदी पात्राच्या परिसरात शोष खड्डे तयार करणे, नदी काठावर घाट उभारणे, एलईडी पथदिवे लावणे, वृक्षारोपण आणि उद्यानांची निर्मिती करणे इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. शासनाकडून निधी प्राप्त होण्याची वाट न बघता, अकोलेकरांच्या लोकसहभागातून दोन वर्षात मोर्णा नदीकाठी विविध विकास कामांसह सौंदर्यीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.
मोर्णा ‘डीपीआर’ दीड वर्षांत शासनाकडे होणार सादरलोकसहभागातून मोर्णा नदी विकास आणि सौंदर्यीकरणाचे कामे सुरू करण्यात आल्यानंतर मोर्णा नदी विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. दीड वर्षांत मोर्णा ‘डीपीआर’ जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेनंतर लोकसहभागातून दोन वर्षांत मोर्णा नदीचा विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोर्णा नदी विकास आणि सौंदर्यीकरणासाठी सामान्य अकोलेकर पुढे येतील व सक्रिय योगदानातून मोर्णा विकास करतील, असा मला विश्वास आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी