लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या नावाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी दोन लाख रुपयांची मदत देण्याच्या सबबीखाली शहरात बनावट अर्जांची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील झेरॉक्स सेंटरमध्ये २0 रुपयांत संबंधित अर्जांची मोठय़ा धडाक्यात विक्री सुरू असून, या प्रकरणाची गंभीर दखल भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी घेतली आहे. शहरातील वय वर्षे ६ व त्यापुढील युवतींनी केंद्र शासनाकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत अर्ज सादर केल्यास त्यांना शैक्षणिक खर्चासह उदरनिर्वाहासाठी दोन लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचा गवगवा करत बनावट अर्जांची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहराच्या कानाकोपर्यातील झेरॉक्स सेंटरवर २0 रुपयांमध्ये अर्जांची विक्री केली जात आहे. सदर अर्जासोबत फोटो, मोबाइल क्रमांकासह महत्त्वाचे दस्तावेज सादर करण्याचे निर्देश आहेत. पोस्ट कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बाल विकास विभागाच्या पत्त्यावर अर्ज सादर केले जात आहेत. सदर अर्जांवर प्रभागातील नगरसेवकांची स्वाक्षरी बंधनकारक असल्यामुळे दिवस उजाडताच नगरसेवकांच्या घरी नागरिकांची लगबग सुरू होत असल्याचे चित्र आहे. पक्षाकडून अशा प्रकारच्या कोणत्याही अर्जांचे वितरण करण्याची सूचना नसल्यामुळे या प्रकरणाची भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी गंभीर दखल घेतली आहे.
अफवांना ऊत२0 रुपयांचा अर्ज केंद्र शासनाकडे पाठविल्यास त्याबदल्यात मुलीला दोन लाखांची मदत मिळणार असल्याचा गवगवा होत असल्यामुळे सर्वसामान्यांची अर्ज खरेदीसाठी धावपळ सुरू झाल्याचे बोलल्या जात आहे. नागरिकांनी खातरजमा करूनच अर्जांची खरेदी करणे अपेक्षित असताना शहरात अफवांना ऊत आला आहे.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’अभियानामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार्या अशा कोणत्याही प्रकारच्या अर्जांची आमच्याक डे माहिती उपलब्ध नाही. यासंदर्भात पक्षाकडे खातरजमा केली जात आहे. त्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल. तूर्तास अकोलेकरांनी अफवांना बळी पडू नये. -किशोर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष भाजपा