सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यधुंद, हैदोस घालणार्यांवर नजर ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २0१७ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ड्युटीवर असलेल्या अकोला पोलिसांची ड्युटी ६0 तासांपेक्षा अधिक झाली आहे. नववर्षाचे स्वागत आटोपत नाही तेच कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर असून, गत तीन दिवसांमध्ये त्यांच्या ड्युटीचा कार्यकाळ हा ६0 तासांपेक्षाही अधिक झाला आहे.नववर्षाचे स्वागत आटोपल्यानंतर अकोला पोलीस एक जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे ड्युटीवर कार्यरत होते; मात्र त्यानंतर १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील घडलेल्या घटनेनंतर राज्यातील पोलिसांना २४ तास ड्युटीवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले. २ जानेवारीच्या सकाळपासून पोलीस रस्त्यावर ड्युटीसाठी उतरले आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्रभरानंतर गत तीन दिवसांपासूनही अकोला पोलीस ड्युटीवर असून, आंदोलन व नववर्षाच्या स्वागतामुळे पोलिसांवर मोठा ताण पडला. किरकोळ कारणांवरून पोलिसांशी हुज्जत घालणार्यांनी त्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्याशी सौजन्याने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र बंदची हाक देताच अकोला पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी अकोला पोलिसांना आदेश देऊन मंगळवारी सायंकाळपासूनच कार्यरत केले होते. शहरात चारही बाजूने येत असलेल्या आंदोलकांना समजावून सांगत हे आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत केली. तीन दिवसांपासून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला; मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक एच. सी. वाकडे यांचेही वार्षिक निरीक्षण लवकरच सुरू होणार असून, त्याचाही ताण या पोलिसांवर आहे. अकोला पोलिसांनी गत तीन दिवसांमध्ये बजाविलेल्या सततच्या कर्तव्यामुळे कामाचा ताण मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. याचाच परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्याचे वास्तव आहे.
सर्वाधिक धरणे-मोर्चे अकोल्यातअकोला जिल्हय़ात धरणे, मोर्चे, गणेशोत्सव, कावड महोत्सव, रामनवमी शोभायात्रा, हनुमान जयंती शोभायात्रा, मोहरम, १४ एप्रिल, धम्मचक्र प्रवर्तन दिन, चेट्रीचंड, गोगा जयंतीसह विविध शोभायात्रा व मिरवणूक निघतात. राज्यात सर्वाधिक मिरवणूक व शोभायात्रा अकोला शहर व जिल्हय़ात निघत असून, याचा ताण साहजिकच अकोला पोलिसांवर अधिक असतो.
२४ तास कर्तव्य बजावणार्या पोलिसांचाही विचार करावा. ६ ते ८ तास ड्युटी असणार्या शासकीय नोकरदारांसह व्यापारी, उद्योजक, दुचाकी व चारचाकी वाहन चालकांनी २४ तासांपेक्षा अधिक ड्युटी करणार्या पोलिसांच्या मानसिकतेचा विचार करावा व पोलिसांशी सौजन्याने वागण्याची अपेक्षा आहे. - विलास पाटील, प्रमुख, वाहतूक शाखा अकोला.