लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्या चोरट्यांचा रामदास पेठ पोलिसांना शोध लागला. या चार चोरट्यांना ठाणे पेालिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी अकोल्यातील दोन किलो सोने लुटमार प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली. त्यांच्या अटकेसाठी रामदास पेठ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. प्रशांत कुरियरचे संचालक प्रशांत शहा यांच्या कुरियर सर्व्हिसमध्ये आदर्श कॉलनी येथील रहिवासी हिंमत आनंदराव काकडे हे कुरियर बॉय म्हणून कामाला आहेत. ते मुंबई-हावडा मेल एक्स्प्रेसने ७ फेब्रुवारी २0१७ रोजी रात्री मुंबई येथून अकोल्यात येण्यासाठी निघाले होते. ८ फेब्रुवारीच्या पहाटे अकोला रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकाच्या वाहनतळातील स्वत:ची दुचाकी क्रमांक एम एच ३0 एन ४४९२ काढल्यानंतर समोरील चौकात आले असता पोलीस चौकीजवळ दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी काकड यांच्याकडील १६ लाख १५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली होती. हा प्रकार झाला तेव्हा हिंमत काकडे यांनी आरडाओरड न करता शहा हॉस्पिटलसमोर असलेल्या त्यांच्या मालकाकडे धाव घेतली होती. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. मात्र, जवळपास एक वर्षांचा कालावधी उलटत असताना पोलिसांना या चोरट्यांची माहिती मिळाली नाही. दरम्यान, रामदास पेठ पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील या चार चोरट्यांनी ही चोरी केल्याची क बुली दिली. त्यांच्या अटकेसाठी रामदास पेठ पोलीस रवाना झाले आहेत.
५0 हजारांचे ठेवले होते बक्षिसआठ महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही चोरट्यांची माहिती मिळत नसल्याने त्यांची माहिती देणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने ५0 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही स्थानिक गुन्हे शाखेच्या हातात काहीच लागले नाही. या चार चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेजही राज्यभर पाठविले. मात्र, पोलिसांचा तपास जैसे-थेच होता. मात्र, ठाणे पोलिसांनी एक टोळी अटक केली असून, या टोळीतील सदर चार जणांनी अकोल्यातील दोन किलो सोने लुटमार प्रकरणाची कबुली दिली.