अकोला : केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या पथकाने राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा आढावा घेऊन त्यांची तपासणी केली असता अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र राज्यात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र असल्याचा बहुमान मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या गृहमंत्रालय दिल्ली येथील पथकाने काही महिन्यांपूर्वी राज्यभरातील पोलीस प्रशिक्षण केंद्राचा आढावा घेतला होता. यामध्ये विविध बाबींची तपासणी केल्यानंतर सर्वोत्कृष्ट पोलीस प्रशिक्षण केंद्राची यादी घोषित करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्राला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण केंद्राचा बहुमान मिळाला आहे. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये एका जवानाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध असून, त्याला योग्य पोलीस बनण्यासाठी येथे प्रशिक्षित आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग असल्याचे गृहमंत्रालयाने केलेल्या तपासणीत समोर आले आहे. अकोला पोलीस दलासाठी ही अभिमानाची बाब असून, त्यामुळे युनिक होम मिनिस्ट्री ट्रॉफी या पुरस्काराने अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राला सन्मानित करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातून अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राला मिळालेला हा बहुमान अकोला शहरासाठी गौरवास्पद असल्याचे बोलले जात आहे.