- सचिन राऊत
अकोला : अकोलापोलिसांनी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून सुरू केलेला ‘नो मास्क नो व्यवहार, हा उपक्रम आता राज्यभरात सुरू होणार आहे. अकोला पोलिसांची या उपक्रमाची दखल राज्य शासनाने घेऊन नो मास्क नो सवारी, नो मास्क नो बुक, नो मास्क नो मेडिकल, नो मास्क नो किराणा, यांसह नो मास्क नो व्यवहार हा उपक्रम आता राज्यभरात सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सहकाऱ्यांसह पेट्रोल पंप, पुस्तक विक्रीची दुकाने, ठोक किराणा बाजार, भाजी बाजार, आॅटो या ठिकाणावर नो मास्क नो पेट्रोल डीझल, नो मास्क नो बुक्स, नो मास्क नो डील, नो मास्क नो सवारी ही मोहीम सुरू केली. विविध संघटनेचा सहभाग तसेच पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीने अल्पावधीतच ही मोहीम राज्य स्तरावर राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेऊन मोहिमेचे कौतुक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वकांक्षी प्रोजेक्ट असलेला माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्यमध्ये आता नो मास्क नो व्यवहार, ही मोहीम राबविण्याच्या स्पष्ट सूचना शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. असा राहणार उपक्रमआता विना मास्क कोणताच व्यवहार होणार नाही. कोणीही व्यापारी किंवा सेवा देणारे किंवा सेवा घेणारी कोणतीच व्यक्ती विना मास्क राहणार नाही. विना मास्कच्या कोणत्याच व्यक्तीसोबत आता कोणताही व्यवहार होणार नाही. गत १५ दिवसांपासून अकोला पोलीस राबवित असलेल्या नो मास्क नो....... मोहिमेला मिळालेली पावतीच आहे. मास्क न घालणे सामाजिक अपराधनुकतेच एका याचिकेवर निर्णय देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने एखादी व्यक्ती मास्क न घालता गर्दीत फिरत असेल तर तो एक सामाजिक अपराध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नो मास्क नो.... मोहिमेचे महत्त्व अधोरेखित होते.