लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात येणार आहे. २४ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, मतदानाची तयारी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ९४ ग्रामपंचायतींच्या आठ सरपंच पदांसाठी आणि १६८ सदस्य पदांसाठी पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये आठ सरपंच पदांसाठी आणि ७४ सदस्य पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसून, ७0 सदस्य पदांची निवडणूक अविरोध झाली आहे. त्यामुळे १८ ग्रामपंचायतींच्या २४ सदस्य पदांच्या जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. २४ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी २१ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाची तयारी प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली असून, ८ हजार ४८६ मतदार निवडणूक रिंगणातील मतदारांचे भाग्य ठरविणार आहेत. मतमोजणी बुधवारी संबंधित तहसील कार्यालयाच्या ठिकाणी होणार आहे.
घुंगशीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदानमूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात येत आहे. एक सरपंचपद आणि सहा सदस्य पदांसह एकूण सात जागांसाठी या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.