लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : दोन महिन्याआधी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला-पुणे शिवशाही बसगाडीला औरंगाबादमध्येच ब्रेक लागला आहे. पुणे मार्गावर शिवशाहीला अपेक्षित असलेला प्रतिसाद न मिळाल्याने ही बस २२ डिसेंबरपासून औरंगाबादमध्येच थांबणार आहे. त्यामुळे अकोला-पुणे शिवशाही रद्द झाली असून, शुक्रवारपासून ही बस अकोला-औरंगाबाद आणि औरंगाबाद-अकोला या मार्गावर धावणार आहे.नियमित भाडे येत नसल्याने लांब पल्ल्यावरील प्रवासी रातराणी गाड्या एसटी महामंडळाने बंद केल्यात. दरम्यान, वातानुकूलित असलेल्या शिवशाही बसगाड्या राज्यात सर्वत्र सुरू केल्यात. अकोला आगार क्रमांक १ साठी तीन आणि आगार क्रमांक २ साठी तीन, अशा एकूण सहा गाड्या दिल्या गेल्या होत्या. यापैकी चार बसगाड्या अकोला-नागपूर, तर दोन गाड्या अकोला-पुणे सुरू करण्यात आल्यात. २ ऑक्टोबर १७ गांधी जयंतीपासून सुरू झालेल्या या बसगाड्यांपैकी नागपूर फेरीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अकोला-पुणे मार्गावर धावणार्या शिवशाहीला अपेक्षित असलेला प्रतिसाद लाभला नाही. ३0 टक्के प्रवासी वाहतुकीमुळे पुणे मार्गावर धावणार्या दोन्ही बसगाड्या तोट्यात चालत आहेत. ऑक्टोबरपासून सातत्याने तोट्यात चालत असलेल्या अकोला-पुणे, पुणे -अकोला शिवशाहीला एसटी मंडळाने ब्रेक लावून, तोट्यातून काढण्याचा प्रयत्न केला आहे. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी अकोल्यातून निघालेली शिवशाही औरंगाबादमध्येच थांबविण्यात येणार आहे. अकोल्यातून पुण्याकडे जाणार्या प्रवाशांना औरंगाबाद येथून पुण्यासाठी वेगळी शिवशाही शोधावी लागणार आहे.
लग्न समारंभासाठी शिवशाहीला अधिक मागणी५४ रुपये प्रतिकिलोमीटर अंतराच्या दरात नवी-कोरी वातानुकूलित शिवशाही लग्न समारंभासाठी भाडेतत्त्वावर मिळत असल्याने सवारीपेक्षा जास्त मागणी लग्न समारंभाच्या कार्यक्रमासाठी होत आहे. अनेकांना ही गाडी मिळविण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागत आहेत. लाब डब्ब्याची सवारी गाडी ४४ रुपये प्रतिकिलोमीटर अंतराच्या दराने दिली जाते. त्या तुलनेत ५४ रुपयांत नवी अन् वातानुकूलित शिवशाही गाडी मिळत असल्याने सर्वत्र मागणी वाढली आहे. किमान साडेतीनशे किलोमीटरसाठी शिवशाही देण्याची अट लागू आहे. नागरिक आणि एसटी महामंडळ दोघांसाठीदेखील शिवशाही परवडणारी सिद्ध होत आहे.