लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला रेल्वेस्थानकावरील साफसफाईच्या कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्याने येथील स्वच्छता धोक्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आऊट सोर्सिंगवर असलेले २५ कर्मचारी अचानक कमी झाल्याने अकोला रेल्वेस्थानक स्वच्छ ठेवणे स्टेशन प्रबंधकांसाठी जिकरीचे ठरत आहे. जोपर्यंत आऊट सोर्सिंगचा कंत्राट भुसावळ डीआरएमकडून नवीन संस्थेला दिला जात नाही, तोपर्यंत अकोला रेल्वेस्थानकावरील स्वच्छता केवळ १५ रेल्वे कर्मचार्यांच्या चालविली जाणार आहे.अकोला रेल्वेस्थानकास भुसावळ विभागातील स्वच्छ रेल्वेस्थानकाचा पुरस्कार प्राप्त झालाआहे ; मात्र या पुरस्काराला साजेसा परिसर ठेवणे आता अकोला रेल्वे विभागासाठी कठीण झाले आहे. कारण अकोला रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारी पेलणार्या संस्थेचा साफसफाईचा कंत्राट ५ डिसेंबर १७ रोजी संपुष्टात आला. त्यामुळे आऊट सोर्सिंगनुसार भरण्यात आलेले २५ कर्मचारी रेल्वेस्थानकावरून कमी झाले आहेत. त्यामुळे स्थानक अस्वच्छ होत आहे. अकोला रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक जी.बी.मीणा यांनी रेल्वेस्थानकावरील दैनंदिन कामकाजावर असलेल्या रेल्वे प्रशासनाच्या १५ महिला-पुरूष कर्मचार्यांना या कामी लावले आहे; मात्र विस्तारलेल्या अकोला रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्मवर स्वच्छता ठेवण्यासाठी ही यंत्रणा अपुरी आहे.
पूर्वीच्या कंत्राटदाराची मुदत संपुष्टात आल्याने अकोला रेल्वेस्थानकावरील स्वच्छतेची जबाबदारी आमच्यावर आली आहे. पुढील कंत्राट जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत अकोला रेल्वे प्रशासनाचे कर्मचारीही देखभाल पाहणार आहेत. पंधरवड्यात ही व्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता आहे.-जी.बी.मीणा, रेल्वे स्टेशन अधीक्षक, अकोला.