अकोला : अकोला रेल्वेस्थानकावरील चार आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक तिकीट खिडकी १ जून १८ पासून बंद केल्या जाणार असल्याचा निर्णय भुसावळ रेल्वे मंडळाने घेतला आहे. अकोलासह नाशिक, मनमाड, अमरावती आणि खंडवा येथील तिकीट खिडक्यांची संख्याही कमी केली जात आहे. १ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.आपल्या रेल्वे प्रवासाला अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रवासी आरक्षण करून दूरचा प्रवास करतात. अलिकडे रेल्वे आरक्षणासाठी नागरिक रेल्वे स्थानकावर कमी आणि डिजिटल प्रणालीचा जास्त वापर करीत असल्याची आकडेवारी समोर आली. त्यामुळे रेल्वे विभागाने पेपरलेसच्या दिशेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. त्या दिशेचे हे पहिले पाऊल असून, रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडक्या बंद केल्या जात आहेत. यामुळे मनुष्यबळ आणि पेपरचा वापर कमी होणार आहे. अकोला रेल्वेस्थानकावर पूर्वी चार आरक्षण खिडक्या होत्या. त्यांचा अलिकडचा प्रतिसाद कमी झाल्याने तीन खिडक्या सेवारत ठेवून एक खिडकी बंद करण्यात येत आहे. दररोज प्रत्येक आरक्षण खिडकीवर १५० तिकिटांची मागणी असली पाहिजे, असा नियम आहे; मात्र अकोला स्थानकावर केवळ १०० ची मागणी अधोरेखित झाली आहे, त्यामुळे एक खिडकी बंद होत आहे.मध्यरेल्वेच्या अनेक रेल्वेस्थानकावरील प्रत्यक्ष आरक्षण प्रणालीतील गर्दी कमी झाली आहे. इंटरनेट आणि आईआरसीटीसी, मोबाइल रेल्वे अॅपद्वारे कामकाज होत आहे. त्यामुळे आरक्षण खिडक्यांवरील गर्दी ओसरली आहे. डिजिटाईजेशनचा हा परिणाम आहे.- सुनील मिश्रा, सीनियर डीसीएम, रेल्वे मंडळ, भुसावळ.