अकोला : रेल्वे मंत्रालयाने देशातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी ज्या रेल्वेस्थानकांची यादी तयार करण्यात आली आहे, यामध्ये अकोला रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. या कामाची जबाबदारी रेल्वे जमीन विकास प्राधिकरणला (आरएलडीए ) देण्यात आली असून, आरएलडीए या कामाचा मास्टर प्लॅन तयार करत आहे. त्यामुळे लवकरच अकोला रेल्वेस्थानकाचा कायापालट होऊन प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती रविवारी (दि. १५ मे) येथे आलेले मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मध्य रेल्वेअंतर्गत असलेल्या रेल्वेस्थानकांच्या द्विवार्षिक निरीक्षण दौऱ्याच्या निमित्ताने रविवारी सायंकाळी अनिलकुमार लाहोटी हे अकोला रेल्वेस्थानकावर आले होते. यावेळी त्यांनी रेल्वेस्थानक परिसर व विविध विभागांची पाहणी केली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी दौऱ्याची माहिती दिली. लोकमतने रेल्वेस्थानकावरील सुविधांबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले की, संपूर्ण पुनर्विकासासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या स्थानकांच्या पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन तयार करत आहे. मास्टर प्लॅन तयार झाल्यानंतर ईपीसी कंत्राट पद्धतीद्वारे रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. विकास झाल्यानंतर येथील प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा मिळतील, असे लाहोटी म्हणाले.
अकोला रेल्वेस्थानकावर होम प्लॅटफाॅर्मची वाढती मागणी पाहता तसा प्रस्ताव तयार करून तो रेल्वे मंडळाकडे पाठवण्यात आला आहे. नॅशनल स्टेशन ग्रेड -३ या श्रेणीच्या अकोला स्थानकावरील सुविधा समाधानकारक आहेत. या ठिकाणी दोन लिफ्ट असून, लवकरच तिसऱ्या लिफ्टचे काम सुरु होत आहे. याशिवाय दोन सरकत्या जिन्यांचे काम सुुरू होणार आहे. त्यासोबतच दक्षिण मध्य व मध्य रेल्वेच्या फलाटांच्या जोडणीचे कामही करण्यात येणार असल्याचे सांगत येथील सुविधांबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचेही लाहोटी यांनी सांगितले.