अकोला: जिल्हय़ातील सातही तालुक्यात गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस बरसला. या दमदार पावसामुळे जिल्हय़ातील खरीप पिकांना संजीवनी मिळाली असून, येत्या रब्बी हंगामासाठीदेखील हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तापणार्या कडाक्याच्या उन्हामुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यामुळे खरीप पिकांवर ताण आल्याने, जिल्हय़ात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात होती. गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ आणि पावसाचे वातावरण होते. सकाळी ११ वाजतापासून अकोला शहरासह जिल्हय़ातील सातही तालुक्यात पाऊस सुरू झाला. अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. जिल्हय़ात सार्वत्रिक दमदार बरसलेल्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी इत्यादी खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. खरीप पिकांप्रमाणेच येत्या रब्बी हंगामासाठीदेखील हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. या पावसामुळे जमिनीतील वाढणारा ओलावा रब्बी हंगामातील पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.
*अकोल्यात २६.0६ मि.मी. पाऊस!
गुरुवारी दिवसभर अकोला शहरात दमदार पाऊस बरसला. रात्री ८.३0 वाजेपर्यंत शहरात २६.0६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. अतवृष्टीचा इशारा! गुरुवारी दुपारी १२ ते शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत या २४ तासात अकोला जिल्हय़ासह विदर्भात अतवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा नागपूर येथील हवामान वेधशाळेकडून देण्यात आला.
*धरणातील जलसाठय़ात अद्याप वाढ नाही
जिल्हय़ातील जलसाठय़ात अद्याप कोणतीही वाढ झाली नाही. काटेपूर्णा धरणात २७ टक्के जलसाठा कायम असून, या धरणाच्या परिसरात केवळ २ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मोर्णा धरणाच्या परिसरात मात्र शून्य टक्के पाऊस आहे. या धरणाची पातळी ३७ टक्के आहे. उमा धरणाच्या परिसरात १0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या धरणात आजमितीस २८ टक्के जलसाठा आहे. निगरुणा धरणाचा जलसाठा ५१ टक्के असून, या परिसरात २७ मि.मी. पावसाच नोंद झाली आहे.