अकोला: गेल्या २४ तासांत बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात अतवृष्टी झाली असून,नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी सकाळपासून बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर येथे संततधार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १७९.४३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, सातही तालुक्यात अतवृष्टी झाली. बुधवारी दुपारपर्यंत पाऊस सुरूच होता. अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अकोला-आकोट मार्गावरील गांधीग्रामच्या पुलावरून २५ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. मोर्णा नदीला आलेल्या पुरामुळे अकोला शहरानजीकच्या चांदूर गावाचा संपर्क तुटला. तसेच विद्रुपा नदीला आलेल्या पुरामुळे तेल्हारा तालुक्यात तळेगाव वडनेर, नवी उमरी, तळेगाव पातुर्डा या गावांचा संपर्क तुटला. बाळापूर तालुक्यात अंदुरा येथील पानखास नाल्याला आलेल्या पुरामुळे शेगाव-आकोट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, या गावाचा संपर्क तुटला. पानखास नाल्याला आलेल्या पुरात पेट्रोलचा टँकर अडकला असून, पुरामुळे टँकरच्या टपावर बसलेल्या टँकर चालक व क्लिनरला पुरातून बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. तेल्हारा तालुक्यात नागझरी नाल्याला आलेल्या पुरात वाडी अदमपूर येथील मंदिरात झोपलेली रेशमा पंढरी भोजने (९0) या वृद्ध महिलेचा मंगळवारी पहाटे वाहून गेल्याने मृत्यू झाला. पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावर सापडला. अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांची वाहतूक बंद झाली. त्यामुळे संबंधित गावांचा संपर्क तुटल्याने, जनजीवन विस्कळीत झाले.
अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी
By admin | Published: August 06, 2015 1:20 AM