संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारिप बहुजन महासंघाच्या नव्या जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षातील इच्छुकांमध्ये ‘रस्सीखेच’ सुरू झाली आहे. जिल्हाध्यक्ष पदावर ‘ओबीसी’ चेहर्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.भारिप बहुजन महासंघाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक सोनोने यांच्यासह पक्षाची प्रदेश कार्यकारिणी आठवडाभरापूर्वी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुषंगाने भारिप-बमसं अकोला जिल्हाध्यक्ष पदासह नवीन जिल्हा कार्यकारिणी गठित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. नव्या जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा पक्षामार्फत १४ किंवा १५ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे. आगामी जिल्हा परिषद-पंचायत समित्यांसह लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर भारिप-बमसं नवीन जिल्हाध्यक्ष पदावर ‘ओबीसी’ चेहर्याची वर्णी लागणार असल्याचे निश्चित मानले आहे. त्यानुषंगाने जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक पक्षातील ‘ओबीसी’ स्थानिक तीन नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांपैकी एकाचे नाव भारिप पक्षश्रेष्ठींकडून एक-दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे जिल्हय़ातील भारिप-बमसं पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
भिरड-रहाटे यांची नावे चर्चेत!भारिप-बमसं नव्या जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा पक्षश्रेष्ठींकडून लवकरच होणार असल्याने, पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड तसेच नुकत्याच पार पडलेल्या ‘ओबीसी’ मेळाव्याचे अध्यक्ष अँड. संतोष रहाटे , विद्यमान जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, ज्ञानेश्वर सुलताने यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी भिरड यांचे नाव निश्चित मानले जात असले, तरी ऐनवेळी पक्षश्रेष्ठींकडून जिल्हाध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे जिल्हय़ातील पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
सर्वसमावेशक चेहरा हवा; कार्यकर्त्यांचा सूर!भारिप-बमसं जिल्हाध्यक्ष पदासाठी चार नावे चर्चेत असली, तरी आगामी जिल्हा परिषद-पंचायत समित्या आणि लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता, पक्षातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चालेल असा सर्वसमावेक्षक चेहरा म्हणून नवीन जिल्हाध्यक्षाची निवड केल्यास पक्षासाठी फायद्याचे ठरणार आहे, असा सूर पक्षाच्या जिल्हय़ातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात उमटत आहे.