अकोला : ६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांचे भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजन निश्चित केले असून, बॉक्सिंग स्पर्धेचा बहुमान जिल्ह्याला मिळाला आहे. शहरातील स्व. वसंत देसाई स्टेडीयममध्ये शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धा रंगणार असून, दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उद्घाटन होणार आहे. त्यानुषंगाने स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
स्पर्धेत देशभरातून १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील तब्बल १,२०० विद्यार्थी सहभाग घेणार असल्याची माहिती आहे. वसंत देसाई स्टेडिअम परिसरात तीन बॉक्सिंग रिंग बनविण्याचे काम शुक्रवारी अंतिम टप्प्यात पोहोचले होते. स्पर्धेचे उद्घाटन रविवार, दि. २४ डिसेंबर रोजी होणार असून, समारोप २९ डिसेंबरला होणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनात क्रिडा अधिकारी मनिषा ठाकरे, उदय हातवळणे, राजेश्वर पांडे आदी परिश्रम घेत आहेत.
२८ राज्यातील खेळाडूंची नोंदणी
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये २८ राज्यातून खेळाडूंची नोंदणी झाली असून, स्पर्धेत १२०० च्यावर खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा सुद्धा शहरात संपन्न झाल्या. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचा बहुमान जिल्ह्याला मिळाला असून, ही बाब अभिमानास्पद आहे.
३० शिक्षकांची घेतली मदत
स्पर्धेमध्ये देशभरातून खेळाडूंचे जिल्ह्यात आगमन होणार आहे. जिल्हा क्रीडा विभागामध्ये बहुतांश जागा रिक्त असल्याने मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ३० शिक्षकांची मदत घेण्यात आल्याची माहिती आहे. खेळाडूंची जेवणाची व्यवस्था सावित्रीबाई फुले कन्या माध्यमिक विद्यालयात करण्यात आली असून, राहण्याची अग्रसेन भवन अकोला, जसनागरा पब्लीक स्कूल, रिधोरा., नॅशनल मिल्ट्री स्कूल, गायगाव येथे करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.