लोकमत न्यूज नेटवर्कअकोट/पोपटखेड : आठ गावांतील पुनर्वसित गावकरी ९ डिसेंबर दुपारपासून केलपाणीत डेरा टाकून आहेत. रात्रं मुला-बाळांसह कुडकुडत्या थंडीत उघड्यावर पुनर्वसित ग्रामस्थांनी काढली. त्या ग्रामस्थांच्या व्यथा जाणण्याकरिता माजी आमदार संजय गावंडे यांनी केलपाणीत १0 डिसेंबर रोजी धाव घेऊन, सर्व पुनर्वसित गावकर्यांच्या भोजनाची व्यवस्था केली.‘गुरूशिवाय लक्ष्य गाठणारा एकलव्य’ हा आदिवासी बांधव आहे. त्यामुळे तुम्हाला कुण्या नेतृत्वाची गरज नाही, स्वतंत्र लढा देण्याची क्षमता पुनर्वसित ग्रामस्थांमध्ये आहे. तुमच्या अधिकारांकरिता आपण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही माजी आमदार संजय गावंडे यांनी दिली. मेळघाटातून पुनर्वसित झालेल्या केलपाणी, गुल्लरघाट, सोमठाणा खु., सोमठाणा बु., धारगड, बारुखेडा, अमोना, नागरतास या गावातील आदिवासी बांधव रोजगार व शेती या प्रमुख मागणीकरिता मेळघाटमध्ये पुन्हा परतणार होते. त्याकरिता ते केलपाणी येथे एकत्र आले. या ठिकाणी आमदार बच्चू कडू पोहोचल्यानंतर आंदोलनाची दिशा ठरणार होती; परंतु बच्चू कडू यांनी अमरावती जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर योग्य तोडगा काढण्यात येईल. त्यामुळे पुनर्वसित ग्रामस्थांनी तूर्त दोन दिवस केलपाणीतच थांबण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत रात्रंभर आपल्या मुला-बाळांसह साहित्य घेऊन केलपाणीत असलेल्या ग्रामस्थांना प्रशासनाने सुद्धा वार्यावर सोडले. अशा स्थितीत माजी आमदार संजय गावंडे यांनी या ठिकाणी धाव घेऊन आदिवासी बांधवांशी चर्चा केली. २0 टक्के राजकारण, ८0 टक्के समाजकारण, अशी शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेना ही तुमच्यासारख्या आंदोलनातूनच उभी झाली आहे. आपण याठिकाणी कोणतेही राजकारण करायला आलो नाही, केवळ तुम्ही केलपाणीत असेपर्यंत तुमच्या भोजनापासून तर सर्व सुविधा देण्याकरिता या ठिकाणी आलो असल्याचे सांगून तुमच्या न्यायाकरिता पाठीशी असल्याचे संजय गावंडे यांनी सांगितले. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी सुद्धा शासनाने दिशाभूल करून, आदिवासी बांधवांना जंगलाबाहेर काढले, त्यामुळे तुमच्या अधिकारांकरिता आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. याप्रसंगी पुनर्वसित ग्रामस्थांना, आदिवासी बांधवांना भोजन दिले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्याम गावंडे, विक्रम जायले, सुभाष सुरत्ने, अजाबराव भास्कर, सुधाकरराव भास्कर, मनीष तायडे,प्रकाश डाखोरे , विष्णू राऊत, चंपालाल बेठेकर, पनालाल जमुनकार, माणिकराम गवते, रामशिंग धांडे, राजू वासकला, हरिनाम बेठेकर, मदन बेलसरे,शांताराम कासदेकर, अर्जुन गेजगे आदी उपस्थित होते.
पुनर्वसित गावकर्यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार बच्चू कडू व पुनर्वसित ग्रामस्थांचे प्रतिनिधी ११ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे केलपाणीत हजर असलेल्या पुनर्वसित गावकर्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर आमदार बच्चू कडू हे आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. तोपर्यंत ग्रामस्थ केलपाणीत ठिय्या देऊन आहेत. विशेष म्हणजे आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू असताना या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून एकाही सत्ताधारी लोकप्रतिनिधीने भेट दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
केलपाणीत आंदोलन सुरू असेपर्यंत सर्वांच्या जेवणाची व्यवस्था आपण करणार आहोत. पुनर्वसित गावकर्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाने व प्रशासनाने सकारात्मक विचार करून न्याय द्यावा. - संजय गावंडे, माजी आमदार, अकोट