अकोला : जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड गुरुवार, १६ जानेवारी रोजी रोजी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापतीपदांची आरक्षण सोडत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात आली. सभापतीपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने, आता सभापती व उपसभापतींच्या निवडीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल गत ८ जानेवारी रोजी जाहीर झाला. नवनिर्वाचित सदस्यांमधून पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड १६ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापतीपदांची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत १३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत सातही पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. सभापतीपदांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींच्या निवडीसाठी राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. सभापती-उपसभापतींच्या निवडीसाठी राजकीय पक्षांकडून सुरु करण्यात आलेल्या मोर्चेबांधणीत कोणकोणत्या पंचायत समित्यांमध्ये कोणकोणत्या पक्षांचे सभापती व उपसभापतींची निवड होते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अकोला : पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण जाहीर; मोर्चेबांधणी सरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 6:18 PM