अकोला: चोरीचे सोने खरेदी केल्या प्रकरणात अलिबाग पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अकोल्याच्या सराफ बाजारातील एका सराफा व्यावसायिकाला दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. या सराफा व्यावसायिकाने पोलिसांना पाच ग्रॅम सोने दिले आहे. आणखी सोने जप्त करायचे असल्याने, सराफाला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील २७३ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची विक्री अकोल्यातील सराफा व्यावसायिकाला केल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली. तपासासाठी २१ जानेवारी रोजी अलिबाग पोलीस अकोल्यात आले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सराफ बाजारातील सराफा व्यावसायिक संजय केजडीवाल याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने सोने खरेदी केले नसल्याचे सांगितले. नंतर मात्र सोने काढून दिले. अलिबाग पोलिसांना गुन्ह्यातील २७३ ग्रॅम सोने जप्त करायचे असल्याने, या सराफा व्यावसायिकास पोलिसांनी अलिबागला नेले. त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवले. त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)