- रवी दामोदरअकोला - लहु शक्ती महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष, तथा साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक समिती महाराष्ट्र शासनाचे उपाध्यक्ष तथा सदस्यसचिव, ज्येष्ठ समाजसेवक मधुकरराव आनंदराव कांबळे यांचे दिर्घ आजाराने मंगळवार, दि.२५ जूलै रोजी निधन झाले.
बुलढाणा जिल्ह्यातील शेंदाला छोट्याशा गावात मधुकरराव कांबळे यांचा सामान्य कुटुंबात जन्म झाला. शालेय जीवनापासूनच समाज कार्यास सुरुवात करून ते राजकीय कार्यात सक्रीय झाले. १९८३ मध्ये त्यांची विदर्भ विकास महामंडळाच्या संचालक पदी नियुक्ती झाल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्यांनी १९८४ ला सामाजिक न्याय व समतेसाठी संघर्ष व जनजागृतीमोहिमेकरीता दलीत समता परीषदेची स्थापना केली. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने राज्य रोजगार हमी योजना समितीच्या सदस्यपदी नेमणुक केली. काही काळ ते महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षही होते.
लहू शक्तीची स्थापना केल्यानंतर त्यांच्या कार्याला गती मिळाली. २००३ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षात त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष, अनु.जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश चिटणीस आदी पदे भुषविले. सन २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती महाराष्ट्र शासनामध्ये उपाध्यक्ष तथा सदस्य सचीव पदी नियुक्ती देण्यात आली होती. आजारपणामुळे ते अकोला शहरात रहिवासी झाले होते. अखेर दिर्घ आजारामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.