- आशिष गावंडे
अकोला : ''हाइब्रिड एन्युइटी'' प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या दिंडी मार्गाच्या संथ गतीमुळे रस्त्याच्या कामाला खोळंबा निर्माण झाला आहे. कोरोनामुळे अर्थचक्र विस्कळीत झाल्याने या मार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला कर्ज देण्यास बँकांनी आखडता हात घेतला आहे. याचा परिणाम रस्त्याच्या निर्माणकार्यावर झाला असून, वाहनचालकांचा जीव धोक्यात आल्याचे दिसत आहे.
तत्कालीन भाजप-सेना युती सरकारच्या कालावधीत २०१६-१७ मध्ये ''हाइब्रिड एन्युइटी'' प्रकल्पांतर्गत शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गासाठी सुमारे ७०० कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये शेगावपासून या मार्गाच्या निर्माणकार्याला सुरुवात करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून दिंडी मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून रस्ता रुंदीकरणासाठी खाेदकाम करण्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या नाकीनव आले आहेत. पावसाळ्यात अर्धवट दुरुस्ती केलेला रस्ता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. यामुळे नागझरी, कळंबा, कसुरा, पारस, निमकर्दा, गायगाव, भौरद, कळंबेश्वर, गोरेगाव, माझोड, भरतपूर, नकाशी, वाडेगाव आदी
गावांमधील नागरिकांमध्ये प्रशासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
३७१ कोटींचे काम आटोपले; ४४ कोटींचे देयक अदा
पहिल्या टप्प्यात नागझरी ते भौरद, कळंबेश्वर ते वाडेगाव, वाशिम जिल्ह्यातील मेडशी ते डव्हापर्यंत सुमारे ८६ किमी अंतराचे काम करण्यात आले. यामध्ये रस्ता रुंदीकरणाचा समावेश असून, या बदल्यात आजवर ३७१ कोटींची कामे करण्यात आली. यापैकी ४४ कोटींचे देयक अदा करण्यात आले.
१० मीटर रुंद होणार रस्ता
शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गाचे अनेक ठिकाणी १० मीटरपर्यंत रुंदीकरण केले जाणार असून, काही ठिकाणी हा रस्ता ७ मीटरपर्यंत रुंद केला जाईल. यामध्ये डांबरीकरणाचा समावेश आहे.
कोरोनामुळे बँकांनी कर्ज देण्यास आखडता हात घेतल्याने काम करणाऱ्या कंत्राटदारासमोर अर्थसाहाय्याचा पेच निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
-प्रवीण सरनाईक, कार्यकारी अधिकारी, जागतिक बैंक प्रकल्प विभाग