अकोला : जिल्हा दूध संघाने पुरवठा केलेल्या दुधात अल्कोहोल आढळल्याच्या सबबीखाली शासकीय दूध योजनेने गत दोन दिवसांपासून दूध घेण्याचे नाकारल्याने संघाला दूध पुरवठा करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. दुध उत्पादक संघाचे दूध खरेदी करावे, या मागणीसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयात बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुध न स्विकारल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी दिला.जिल्ह्यातील दूध पश्चिम महाराष्टÑातील ‘वारणा’ योजनेकडे पाठविण्याचा सल्ला प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी संघाला दिला आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेला दूध उत्पादक शेतकरी वर्गासाठी हा निर्णय मारक ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे शिवसंग्रामने दुग्धशाळा व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात ठिय्या देऊन घोषणाबाजी केली. शासकीय दूध योजनेने दूध उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागून दूध खरेदी सुरु करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी संघटनेचे बाळासाहेब ठाकरे, सुनिल गणेशपूरे, सागर मोहोड, संगम मोहोड, आकाश सिरसाट, सागर गायकवाड, प्रथमेश देशमूख, गोपाल बंड, अभिजीत खंडारे, राहूल घाटे, शुभम चिखलवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.