अकाेला: प्रधानमंत्री आवास याेजनेच्या अंतर्गत घरकुलांचा लाभ, गुंठेवारी प्रकरणातील घरपट्टे, अमृत याेजनेच्या कामांमुळे ठिकठिकाणी उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, हिंदू स्मशानभूमीसाठी जागेची उपलब्धता अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या कक्षासमाेर मंगळवारी ठिय्या आंदाेलनाची घाेषणा केली हाेती; मात्र हे आंदाेलन स्थगित करून शिवसेनेने मनपा आयुक्तांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली.
शिवसेनेचे गटनेेते राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आदाेलनावेळी त्यांनी महापालिकेच्या कामांबाबत राेष व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास याेजनेच्या अंतर्गत घरकुलांचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थींची फरपट हाेत आहे, या संदर्भात आयुक्तांशी झालेल्या चर्चेत त्यांनी या याेजनेतील अडचणी दूर करून लाभार्थींना दिलासा देण्याचे आश्वासन दिले हाेते; मात्र त्यावर काेणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी आंदाेलनाची भूमिका घेतली. मंगळवारी आयुक्त त्यांच्या कक्षात नसल्याने अखेर त्यांच्याच खुर्चीला हार घालून आयुक्तांना काम करण्याची सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी राजेश मिश्रा यांच्यासह गजानन चव्हाण आदी उपस्थित हाेते.