अकोला : जिल्ह्याला खरीप हंगाम २०२३-२०२४ साठी आवश्यक असलेल्या रासायनिक खतांची मागणी जिल्हा परिषद कृषी विभागाने कृषी संचालकांकडे केली होती. त्यानुसार ८५ हजार ४३० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. त्यामध्ये जिल्ह्यात सार्वाधिक मागणी असलेल्या डीएपी खताच्या मागणीला गतवर्षीपेक्षा ३ हजार मेट्रिक टनने कात्री लावली असून, केवळ १२ हजार ३० मेट्रिक टन खताला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामात डीएपी तुटवड्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहण्याची शक्यता आहे. गतवर्षी खरीप हंगामासाठी डीएपीचा जिल्ह्याला १५ हजार २८९ मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला होता.
रब्बी हंगाम संपुष्टात आला असून, शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. खरिपाच्या तयारीसाठी जिल्ह्याला खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खतांची मागणी जिल्हा परिषद कृषी विभागाने कृषी संचालकांकडे केली होती. त्यानुसार ८५ हजार ४३० मेट्रिक टन खतांचे आवंटन खरिपासाठी मंजूर झाले असून, लवकरच रासायनिक खतांचा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. खरीप हंगाम अवघ्या दोन महिन्यांवर आला असून, बळीराजा तयारीत व्यस्त आहे.
कृषी विभागाकडून जिल्ह्याला यंदा ८५ हजार ४३० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. शिवाय बियाणे-कृषी निविष्ठांची मागणी शासनाकडे केली असून, अद्याप मंजुरीबाबत प्रतीक्षा आहे. हा खतांचा साठा एप्रिल ते सप्टेंबर या खरीप हंगामासाठी लवकरच उपलब्ध होणार असून, या काळात टंचाई भासल्यास खरीप पेरणीचे क्षेत्र पाहून वाढीव मागणी करणार असल्याचीही माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.असे आहे मंजूर खतांचे आवंटन!खतांचे नाव मंजूर साठा (मे. टन)
युरिया २०,९७०डीएपी १२,०३०
एमओपी ३०००एसएसपी २०,६९०
संयुक्त खते २८,७४०एकूण ८५४३०
सोयाबीन बियाणांची टंचाई होण्याची शक्यता!जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सार्वाधिक सोयाबीनची पेरणी होते. गतवर्षी उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढला होता, तसेच जिल्ह्यात बियाणे महोत्सव राबविण्यात आल्याने घरगुती बियाणांना शेतकऱ्यांची पसंती मिळाली होती; परंतु यंदा उन्हाळी सोयाबीनचा पेरा घटला आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.