लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी १0 ते २४ फेब्रुवारी या कालावधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासाठीची पूर्वबैठक पोलीस अधीक्षक कलासागर यांनी गुरुवारी घेतली. यामध्ये जिल्हय़ातील विविध विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.अकोला जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हय़ातील शाळा, महाविद्यालय परिसरातील तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पुढाकार घेतला असून, गुरुवारी जिल्हय़ातील इतर विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक राहुल धस, डॉ. भावना मेश्राम, डॉ. फारुख शेख, अन्न व औषध विभागाचे राठोड, उपशिक्षणाधिकारी व्ही. व्ही. धनाडे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या नियंत्रणातील पथक १0 ते २४ फेब्रुवारीपर्यंत कार्यरत राहणार आहे. हे पथक शाळा व महाविद्यालयाच्या परिसरापासून १00 मीटर आत तंबाखू, सिगारेट, विडी व गुटखा विक्री होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हय़ातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर एक नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. या नोडल अधिकार्यासोबत इतर विभागाचे अधिकारी राहणार असून, ते तंबाखूजन्य पदार्थ विक्री रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यासोबतच कुणालाही अशाप्रकारे विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा.- एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक