लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा (बाळापूर): कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलसदृश परिस्थितीचे पडसाद २ जानेवारी रोजी बाळापूर तालुक्यातील लोहारा येथेही उमटले. संतप्त जमावाने बसवर दगडफेक केल्याने यातील चार प्रवासी जखमी झाले, तसेच बसच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले. या दगडफेकीत बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी व उरळचे ठाणेदार यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
औरंगाबादवरून परतवाडा येथे जाणारी बस क्र. एमएच ४0 एक्यू ६२७६ लोहारा फाट्यावर येताच ३0 ते ३५ जणांच्या जमावाने बसवर दगडफेक केली. बसचालक अशोक लाखेकर यांनी प्रसंगावधान राखत वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. काही क्षणातच उरळचे ठाणेदार सोमनाथ पवार ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच दगडफेक करणार्यांनी पळ काढला. घटनेचे गांभीर्य पाहता गावात ‘एसआरपी’ची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती. तसेच बाळापूरचे उ पविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी गावात भेट देऊन पाहणी केली. या दगडफेकीत बसमधील ३५ प्रवाशांपैकी चार गंभीर जखमी झाले, तर काही किरकोळ जखमी झाले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमींमध्ये लता अनिल बनकर (२७), ओम अनिल बनकर (७) रा. अकोट, मारोती तुकडाजी बागड (७0) रा. चांदूर बाजार यांचा समावेश आहे. गंभीर जखमींवर तत्काळ लोहारा उ पकेंद्रात डॉ. सुनील चहाकर यांनी उपचार सुरू केले. पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली असून, गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शेगाव आगारचे असहकार्य लोहारा गावाजवळ घडलेल्या या घटनेची माहिती शेगाव आगाराच्या अधिकार्यांना देण्यात आली; मात्र एवढी मोठी घटना होऊनही आगाराचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचले नाही. प्रवासी दगडफेकीनंतर मदतीची याचना करीत असताना त्यांना बराच वेळ मदतच मिळाली नाही, तसेच दुसरी बसही वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे प्रवाशांनी आगाराविषयी रोष व्यक्त केला.